४४ गावातील सातबारा होणार बिनचूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 08:45 PM2017-12-07T20:45:09+5:302017-12-07T20:45:27+5:30
सातबाऱ्यातील त्रुटींमुळे अनेक शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. तर छोट्याशा त्रुटीमुळे त्यांना शासकीय कार्यालय आणि न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात.
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : सातबाऱ्यातील त्रुटींमुळे अनेक शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. तर छोट्याशा त्रुटीमुळे त्यांना शासकीय कार्यालय आणि न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात. हीे अडचण लक्षात घेत महसूल आणि भूमि अभिलेख विभागातर्फे जमिनीची पुर्नमोजणी करुन बिनचूक सातबारा तयार करुन दिला जाणार आहे. यासाठी शेतकºयांकडून कुठलेही शुल्क घेतले जाणार नाही.
चकबंदीनंतर गोंदिया तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या सातबारामध्ये त्रुटी आढळल्या. परिणामी शेतकऱ्यांना विविध अडचणीना सामोरे जावे लागत होते. तर अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत होते. सातबारातील त्रुटी दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी भूमि अभिलेख आणि महसूल विभागाकडे अर्ज आणि शुल्क भरुन देखील रेकार्ड दुरूस्ती करुन देण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. शेतकºयांची ही अडचण लक्षात घेत आ. गोपालदास अग्रवाल यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्रुटी असलेल्या शेतकºयांच्या सातबाराची नि:शुल्क दुरूस्ती आणि पुर्नमोजणी करुन देण्याची मागणी केली. त्यानंतर महसूल विभागाने किती गावांमधील शेतकºयांच्या सातबारामध्ये त्रुटी आहेत, याचे सर्वेक्षण केले असता गोंदिया तालुक्यातील ४४ गावांमधील सातबारामध्ये सर्वाधिक त्रुटी आढळल्या. या सर्व त्रुटी संबंधित विभागाने जमिनीची पुर्नमोजणी करुन दुरूस्त करुन द्याव्यात. यासाठी आ. अग्रवाल यांनी महसूल विभागाचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, भूमि अभिलेख विभागाचे विभागीय उपसंचालक बाळासाहेब काळे, जमाबंदी आयुक्त आणि भूमिअभिलेख विभागाच्या अधिकाºयांची बैठक घेतली. त्यानंतर महसूल विभागाचे सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी सातबारामधील त्रुटी दूर करण्याचे निर्देश दिले. उपसंचालक काळे यांनी गोंदिया तालुका भूमि अभिलेख निरीक्षक पवार यांना दोन महिन्यात पुर्नमोजणीचे काम पूर्ण करुन सर्व शेतकºयांच्या सातबारामधील त्रुटी दूर करुन शेतकऱ्यांना सुधारित सातबारा वितरीत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला असून दुरूस्तीसाठी करावी लागणारी पायपीट सुद्धा कमी होणार आहे.
चूक शासनाची, भुर्दंड शेतकऱ्यांना का
सातबारामधील त्रुटीस महसूल आणि भूमिअभिलेख विभागाची यंत्रणा जबाबदार आहे. त्यात दुरूस्ती करून देण्यासाठी शेतकऱ्यांकडून कुठलेही शुल्क वसूल करण्यात येऊ नये. त्रुटींना पूर्णपणे प्रशासकीय यंत्रणा जबाबदार आहे, मग त्याचा आर्थिक भूर्दंड शेतकऱ्यांना का? असा सवाल उपस्थितीत करित आ.अग्रवाल यांनी याला विरोध केला. तसेच एकाही शेतकºयाकडून शुल्क वसूल न करण्याची मागणी केली होती. त्याची शासनाने दखल घेत जमिनीची पुर्नमोजणी नि:शुल्क करुन देण्याचे निर्देश उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे.
या गावातील सातबारात सर्वाधिक त्रुटी
गोंदिया तालुक्यातील सातबारामध्ये सर्वाधिक त्रुटी असलेल्या गावांमध्ये एकोडी, गंगाझरी, महालगाव, मुरदाडा, अदासी, दतोरा, दागोटोला, नवरगाव खुर्द, पोवरीटोला, मोरवाही, आसोली, बटाना, मुरपार, पिपरटोला, नवेगाव (धा.) या गावांचा समावेश आहे.