गोंदिया मेडिकल कॉलेज व रुग्णालयासाठी ४४८ कोटी
By Admin | Published: June 23, 2016 01:19 AM2016-06-23T01:19:12+5:302016-06-23T01:19:12+5:30
गोंदियातील १०० विद्यार्थी क्षमतेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ५०० खाटांच्या रुग्णालयाच्या विविध इमारतींचे बांधकाम
प्रशासकीय मान्यता : ५०० खाटांच्या रुग्णालयाचे होणार बांधकाम
मनोज ताजने ल्ल गोंदिया
गोंदियातील १०० विद्यार्थी क्षमतेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ५०० खाटांच्या रुग्णालयाच्या विविध इमारतींचे बांधकाम करण्यासाठी ४४८ कोटी ७० लाख ६० हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
राज्य शासनाने ३ जानेवारी २००३ रोजी या महाविद्यालयाला मान्यता दिली होती. त्यानंतर भारतीय वैद्यक परिषदेच्या (एमसीआय) अटींची पूर्तता करण्यासाठी ३ वर्षे लागली. अखेर एमसीआयने अंतिम मान्यता देत मेडिकलच्या प्रथम वर्षाचे वर्ग सुरू करण्यास ग्रीन सिग्नल दिला. त्यामुळे प्रवेशाची प्रक्रिया करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
या मेडिकल कॉलेजसाठी कुडवा येथे जागा घेण्यात आली आहे. त्या जागेवर १०० विद्यार्थी क्षमतेचे महाविद्यालयाचे बांधकाम, निवासी इमारती, वसतिगृह, लायब्ररी इमारत, परीक्षा भवन, संरक्षक भिंत, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज, बगीचा, फर्निचर, पार्किंग, शेड, रेन वॉटर हार्वेस्टिंग, अग्निशमन यंत्रणा, अंतर्गत व बाह्य पाणीपुरवठा व विद्युतीकरण, पाण्याची टाकी, खेळाचे मैदान इत्यादी कामांसाठी सचिव समितीने १६३.६९ कोटी रुपये मंजूर केले आहेत.
तसेच ५०० खाटांचे रुग्णालय, आॅपरेशन थिएटर, इमारत, बाह्यरुग्ण इमारत, आॅपरेशन थिएटर, निवासी इमारती, अंतर्गत व बाह्यपाणी पुरवठा तथा विद्युतीकरण, फर्निचर पार्किंग, शेड, रेन वॉटर हार्वेस्टिंग, अग्निशमन यंत्रणा, पाण्याची टाकी, खेळाचे मैदान आदींसाठी २८५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
पाच वर्षे लागणार
४कामाचा प्राधान्यक्रम ठरवून टप्प्याटप्प्याने पुढील पाच वर्षात या निधीतील कामे पूर्ण करायची आहेत. या कामास सार्वजनिक बांधकाम विभागाची तांत्रिक मंजुरी घ्यायची आहे. आवश्यकतेनुसार प्रस्तावित कामांची किंमत वाढण्याची शक्यता आहे.