लसीकरणात ४५-६० वयोगटाची आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:29 AM2021-05-21T04:29:50+5:302021-05-21T04:29:50+5:30
गोंदिया : कोरोनाला मात देण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यावर जोर दिला आहे. शिवाय आता लसीला घेऊन नागरिकांतील संभ्रम ...
गोंदिया : कोरोनाला मात देण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यावर जोर दिला आहे. शिवाय आता लसीला घेऊन नागरिकांतील संभ्रम ही काहीसा कमी होताना दिसत असून स्वेच्छेने नागरिक लसीकरणासाठी घराबाहेर पडत आहेत. यामुळेच आतापर्यंत जिल्ह्यात २१६०२५ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यात ४५-६० वयोगटातील नागरिकांची आघाडी असून ८३५७० नागरिकांनी लस घेतली आहे. तर ६० वर्षांवरील ७३९१३ ज्येष्ठांनीही लस घेतली आहे.
कोरोनाला मात देण्यासाठी देशात लसीकरणाला १५ जानेवारीपासून सुरूवात झाली आहे. अगोदर कोव्हॅक्सीन व कोव्हीशिल्ड या दोन लसींना शासनाने मंजुरी दिली होती. त्यानंतर आता आणखी काही लसींना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र सध्या तरी या दोनच लसींचा वापर देशात केला जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच कहर केल्याने जास्तीतजास्त लसीकरण करून कोरोनाला थोपविण्यावर शासनाचा भर आहे. हेच कारण आहे की, जिल्ह्यातही लसीकरणाची व्यापक मोहीम राबविली जात असून त्याला नागरिकांचा प्रतिसाद चांगला लाभत आहे.
जिल्ह्यात बुधवारपर्यंत (दि.१९) ची लसीकरणाची आकडेवारी बघितल्यास २१६०२५ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. विशेष म्हणजे, लसीकरणासाठी आता नागरिक स्वत: केंद्रावर जाताना दिसत आहे. म्हणजेच, लसीला घेऊन असलेले संभ्रम व भीती आता कमी होताना दिसत आहे. लसीकरणासाठी शासकीय केंद्र असतानाच खाजगी हॉस्पिटल्सलाही परवानगी देण्यात आली आहे. लसीकरणात प्रामुख्याने ४५-६० वर्षे वयोगटातील नागरिकांची आघाडी दिसत असून ८३५७० नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. तर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकही काही कमी नसून ७३९१३ नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. विशेष म्हणजे, लसीकरणासाठी आता नागरिक गर्दी करीत असल्याने लसीकरण केंद्रांमध्येही वाढ केली जात आहे. जेणेकरून नागरिकांची गैरसोय होऊ नये.
----------------------------
१८-४४ वयोगटाच्या लसीकरणाची मागणी
शासनाने ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला परवानगी दिली आहे. मात्र मध्यंतरी कोरोनाची दुसरी लाट बघता १८ वर्षांवरील नागरिकांसाठीही लसीकरण सुरू करण्यात आले होते. यामध्ये ११६५२ नागरिकांनी लसीकरण करवून घेतले. काही दिवसच चाललेल्या या गटाच्या लसीकरणात ही संख्या मात्र खूप जास्त दिसत आहे. आता या गटाचे लसीकरण बंद असून या गटाचे लसीकरण सुरू करण्याची मागणी पालक व नागरिकांकडून केली जात आहे.