जिल्ह्यात लावणार ४५ लाख २९ हजार ५०० रोपटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 09:53 PM2018-05-09T21:53:39+5:302018-05-09T21:53:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्र शासनाने सन २०१८ मध्ये राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केल्याने या संकल्पात गोंदिया जिल्ह्यात ४५ लाख २९ हजार ५०० रोपटी लावण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने केला आहे. विदेशी वृक्षांची रोपटे लावण्यापेक्षा देशी रोपट्यांना प्राथमिकता देत कोणती रोपटी किती टक्क्याप्रमाणे लावावी यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र शासनाने जुलै २०१७ मध्ये २ कोटी वृक्ष लागवड करण्याचा माणस बांधला होता. सन २०१८ मध्ये राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प महाराष्ट्र शासनाचा आहे. या संकल्पात गोंदिया जिल्ह्याचा वाटा ४५ लाख २९ हजार ५०० रोपट्यांचा राहणार आहे. यात प्रादेशिक वनविभाग १० लाख ७० हजार रोपटे लावेल. सामाजिक वनिकरण ५ लाख रोपटे, वनविकास महामंडळ (एफडीसीएम) ३ लाख, इतर विभागाकडून २० लाख ६० हजार ७२६, जिल्ह्यातील ५४५ ग्राम पंचायती ५ लाख ९९ हजार ५०० रोपटे लावणार आहेत. असे एकूण ४५ लाख २९ हजार ५०० रोपटे लावण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी बहुतांश ठिकाणी खड्डे खोदण्याचे काम पूर्ण झाले. काही ठिकाणी खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे.
देशी रोपट्यांना प्राधान्य
यंदाच्या वृक्षारोपणात एकाच प्रजातीचे रोपटे एक टक्यापेक्षा जास्त लावणार नाहीत. परंतु देशी रोपट्यांना मोठ्या प्रमाणात लावले जाणार आहे. २५ टक्के वड, पिंपळ, उंबर ही रोपटे लावण्यात येणार आहेत. ७५ टक्के आवळा, करू, चारूळी, फळ झाडे व बांबू रोपटे लावली जातील. गोंदिया जिल्ह्यातील ५४५ ग्राम पंचायती गावातील रस्ता व स्माशन भूमीकडे जाणाºया रस्त्यावर वृक्षारोपण करतील. या रस्त्यासाठी १३५६.५४ हेक्टर क्षेत्र प्रपत्र ४ प्रमाणे वृक्षारोपणासाठी खुले आहे.
मागच्या वर्षीची २७ टक्के रोपटी मेली
गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ग्राम पंचायतींनी वृक्षारोपणाच्या कामात चांगले सहकार्य केले. या कामात सर्वात जास्त हलगर्जी आमगाव तालुक्याची झाली आहे. आमगाव तालुक्यात लावलेली ३५ टक्के रोपटी मेली आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ३२ टक्के, देवरी तालुक्यातील १६ टक्के, गोंदिया तालुक्यातील ११ टक्के, गोरेगाव तालुक्यातील २८ टक्के, सालेकसा तालुक्यातील २९ टक्के, सडक-अर्जुनी तालुक्यातील २८ टक्के, तिरोडा तालुक्यातील २५ टक्के रोपटी मेली. जिल्ह्याची टक्केवारी पाहिली असता २७ टक्के रोपटी जगू शकली नाहीत.