मार्केटिंग फेडरेशनच्या 6 केंद्रांवरून 45 हजार क्विंटल धान गायब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2022 09:09 PM2022-10-07T21:09:47+5:302022-10-07T21:10:38+5:30

खरेदी केलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी राईस मिलर्ससह करार करून तांदूळ शासनाकडे जमा केला  जातो. यंदा रब्बी हंगामातील धान खरेदीदरम्यान धान खरेदी केंद्रावरील अनागोंदी कारभार उघडकीस आला. त्यातच आता  सहकारी संस्थांच्या माध्यमातून धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेला तब्बल ४५ हजार क्विंटल धान संबंधित केंद्राच्या गोदामातच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

45 thousand quintals of paddy missing from 6 centers of Marketing Federation! | मार्केटिंग फेडरेशनच्या 6 केंद्रांवरून 45 हजार क्विंटल धान गायब !

मार्केटिंग फेडरेशनच्या 6 केंद्रांवरून 45 हजार क्विंटल धान गायब !

Next

अंकुश गुंडावार 
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आदिवासी विकास महामंडळाच्या देवरी तालुक्यातील आलेवाडा आणि गोरे या दोन धान खरेदी केंद्रांवरील १४ हजार क्विंटल धान गायब असल्याची बाब नुकतीच उघडकीस आली. त्यानंतर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्ह्यातील सहा धान खरेदी केंद्रावरील जवळपास ४५ हजार क्विंटल धान गायब असल्याची बाब पुढे आल्याने खळबळ उडाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात धान नेमके गायब कसे झाले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 
जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून हमीभावाने धान खरेदी करते. यानंतर खरेदी केलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी राईस मिलर्ससह करार करून तांदूळ शासनाकडे जमा केला  जातो. यंदा रब्बी हंगामातील धान खरेदीदरम्यान धान खरेदी केंद्रावरील अनागोंदी कारभार उघडकीस आला. त्यातच आता  सहकारी संस्थांच्या माध्यमातून धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेला तब्बल ४५ हजार क्विंटल धान संबंधित केंद्राच्या गोदामातच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन खरेदी केंद्रावरील धानाची भरडाई  करण्यासाठी उचल करण्यासाठी राईस मिलर्सला डिओ दिले. ते डिओ घेऊन राईस मिलर्स जेव्हा धान खरेदी केंद्रावर पोहोचले  तेव्हा धान खरेदी केंद्रावर धानच नव्हता. त्यामुळे राईस मिलर्सने याची तक्रार जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे  केली. 
असाच  प्रकार सहा केंद्रांवर असल्याचे तक्रारीनंतर पुढे आले आहे. त्यामुळे या केंद्राना मार्केटिंग फेडरेशनने नोटीस बजावली असून  त्यावर त्वरित उत्तर मागविले आहे. दोन दिवसांत उत्तर सादर न केल्यास या धान खरेदी केंद्राच्या संचालक मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

रस्ता खराब असल्याचा बहाणा 
शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेला धान प्रत्यक्षात संबंधित संस्थेच्या गोदामात आणि केंद्रावर  नसल्याची  माहिती आहे. दरम्यान, हा प्रकार उघडकीस येऊ नये यासाठी गोदामापर्यंत वाहन जाण्यासाठी रस्ता बरोबर  नसल्याचे व इतरही कारणे दिल्याची माहिती आहे, पण आता प्रत्यक्षात चौकशीला सुरुवात झाल्याने मोठे घबाड उघडकीस येण्याची शक्यता आहे. 
सहाच नव्हे त्यापेक्षा अधिक केंद्र 
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या केवळ सहाच नव्हे, तर २० ते २५ केंद्रांवरील खरेदी केलेल्या धानात आणि प्रत्यक्षात असलेल्या धानात बरीच तफावत असल्याची माहिती आहे. त्यामुळे या सर्व प्रकारांकडे दुर्लक्ष करणे हा आता जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांना भोवण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या धान खरेदी केंद्राकडे धान शिल्लक राहिला आहे त्याची पाहणी आता या विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी करीत आहेत. 
दुर्लक्ष नेमके कुणाचे 
शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेला धान मोठ्या प्रमाणावर केंद्रावर आणि गोदामात प्रत्यक्षात नसल्याचा प्रकार गंभीर आहे. अशाच प्रकरणात आदिवासी विकास महामंडळाचे देवरीचे उपप्रादेशिक व्यवस्थापक मुळेवार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर मार्केटिंग फेडरेशनचा प्रकार उघडकीस आला असून यात नेमके कुणाचे दुर्लक्ष कारणीभूत आहे, त्यांच्यावर कारवाईची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. 

राईस मिलर्सला केंद्रावरून धानाची उचल करण्याचे डिओ दिल्यानंतर ते धानाची उचल करण्यासाठी गेले असता तिथे प्रत्यक्षात धान नसल्याच्या तक्रारी त्यांच्याकडून प्राप्त झाल्या आहेत. याच आधारावर या केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांना नोटीस बजाविली आहे. दोन दिवसांत यावर उत्तर सादर न केल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. 
-मनोज बाजपेयी
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी

 

Web Title: 45 thousand quintals of paddy missing from 6 centers of Marketing Federation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.