४६ हजार विद्यार्थी देणार दहावी-बारावीची परीक्षा
By admin | Published: February 19, 2017 12:05 AM2017-02-19T00:05:26+5:302017-02-19T00:05:26+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे येत्या २८ फेब्रुवारीपासून बारावीची तर ७ मार्चपासून दहावीची परीक्षा घेण्यात येत आहे.
दहावीचे पाच केंद्र उपद्रवी : बारावीसाठी ६९ तर दहावीसाठी ९८ केंद्र
गोंदिया : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे येत्या २८ फेब्रुवारीपासून बारावीची तर ७ मार्चपासून दहावीची परीक्षा घेण्यात येत आहे. यात जिल्ह्यातून बारावीचे २३ हजार २१३ तर दहावीचे २३ हजार ३६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्वाचा ‘टर्निंग पॉईंट’ म्हणून या बोर्डाच्या परीक्षा ओळखल्या जातात. त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांचा या परीक्षांमध्ये अव्वल येण्यासाठी प्रयत्न सुरू असतो तर अनेक विद्यार्थी केवळ या परीक्षेत उत्तीर्ण झालो तरी धन्य झालो असे म्हणून त्यासाठी विविध क्लृप्त्या लढवतात. यामुळे अनेक केंद्रांवर कॉपीसारखे प्रकार घडतात. त्याला आळा घालण्यासाठी भरारी पथकांची भेट आणि इतर उपाय शिक्षण विभागाने केले आहेत.
इयत्ता बारावीसाठी गोंदिया तालुक्यातील २२ केंद्रावरून ७ हजार ४८६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. आमगाव तालुक्यातील ६ केंद्रांवरून २ हजार ४७ विद्यार्थी, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ७ केंद्रांवरून २ हजार ५३८ विद्यार्थी, देवरी तालुक्यातील ५ केंद्रांवरून १ हजार ८३२ विद्यार्थी, गोरेगाव तालुक्यातील ७ केंद्रांवरून २ हजार ५०५ विद्यार्थी, सडक-अर्जुनी तालुक्यातील ६ केंद्रांवरून २ हजार ४८ विद्यार्थी, सालेकसा तालुक्यातील ६ केंद्रांवरून १ हजार ७१२ विद्यार्थी तर तिरोडा तालुक्यातील १० केंद्रांवरून ३ हजार ४५ विद्यार्थी असे एकूण ६९ केंद्रांवरून २३ हजार २१३ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत.
दहावीसाठी गोंदिया तालुक्यातील २९ केंद्रांवरून ६ हजार ९९८ विद्यार्थी, आमगाव तालुक्यातील १० केंद्रांवरून २ हजार ४२४ विद्यार्थी, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १० केंद्रांवरून २ हजार ८२८ विद्याथीर्, देवरी तालुक्यातील ९ केंद्रांवरून १ हजार ९१६ विद्यार्थी, गोरेगाव तालुक्यातील ९ केंद्रांवरून २ हजार ३२९ विद्यार्थी, सडक-अर्जुनी तालुक्यातील ९ केंद्रांवरून १ हजार ८७६ विद्यार्थी, सालेकसा तालुक्यातील ७ केंद्रांवरून १ हजार ५३३ विद्यार्थी तर तिरोडा तालुक्यातील १५ केंद्रांवरून ३ हजार १३२ विद्यार्थी असे एकूण ९८ केंद्रांवरून २३ हजार ३६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)
सात भरारी पथके राहणार
दहावी व बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी सात भरारी पथकांची निर्मीती करण्यात आली आहे. त्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचे पथक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे पथक, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, डायट प्राचार्य, महिला पथक, बोर्डाचे पथक व जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार एक पथक अशी सात पथके तयार करण्यात आली आहेत.
ही आहेत उपद्रवी केंद्रे
जिल्ह्यात इयत्ता बारावीचे एकही केंद्र उपद्रवी नसल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. परंतु इयत्ता दहावीचे पाच केंद्र उपद्रवी आहेत. त्यात जि.प. शाळा दवनीवाडा, सुदामा हायस्कूल नागरा, मिलींद विद्यालय चान्ना/बाक्टी, सालेकसा हायस्कूल सालेकसा व मानवता विद्यालय बेरडीपार या पाच केंद्रांचा समावेश आहे. या ठिकाणी कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आढळले आहेत.