४७ कोटी आले, पण ४९ कोटी थकीतच ! सोमवारपासून चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 16:59 IST2025-02-17T16:58:37+5:302025-02-17T16:59:02+5:30
दोन महिन्यानंतर आले चुकारे : २४ लाख २२ हजार क्विंटल धान खरेदी

47 crores received, but 49 crores are still outstanding! Defaults on farmers' accounts from Monday
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या ४० हजारावर शेतकऱ्यांचे ९६ कोटी रुपयांचे चुकारे गेल्या दोन महिन्यापासून थकले होते. थकीत चुकाऱ्यांसाठी शासनाने शनिवारी (दि.१५) ४७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. मात्र, यानंतर ४९ कोटी रुपयांचे चुकारे थकीत असून, त्यासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावरून हमीभावाने धान खरेदी केली जाते. खरीप हंगामात जिल्ह्यातील ७६,५४३ शेतकऱ्यांनी २४ लाख २२ हजार क्विंटल धानाची या शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री केली होती. फेडरेशनने खरेदी केलेल्या या एकूण धानाची किंमत ५७९ कोटी रुपये आहे. यापैकी ४० हजारांवर शेतकऱ्यांचे ९६ कोटी रुपयांचे चुकारे गेल्या दोन महिन्यांपासून थकले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाल्याने ओरड वाढली होती. यानंतर शासनाने थकीत ९६ कोटी रुपयांच्या चुकाऱ्यांपैकी ४७ कोटी रुपयांचा निधी शनिवारी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला उपलब्ध करून दिला आहे. तर, अद्यापही ४९ कोटी रुपयांचे चुकारे निधीअभावी थकले असल्याने शेतकऱ्यांना पुन्हा काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
२० हजार रुपये बोनसचे आदेश अद्याप नाही
महायुती सरकारने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान धानाला प्रति हेक्टर २० हजार रुपये बोनस जाहीर केला होता. या घोषणेला आता तीन महिने पूर्ण होत आहे. पण, अद्यापही शासनाने बोनससंदर्भातील आदेश काढलेला नाही. त्यामुळे बोनससाठी पात्र असलेल्या दीड लाखांवर शेतकऱ्यांच्या नजरा याकडे लागल्या आहेत.
सोमवारपासून चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला थकीत चुकाऱ्यांसाठी ४७ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यामुळे आता सोमवारपासून चुकारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहे. येत्या आठ दिवसात पुन्हा निधी प्राप्त होणार असल्याचे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी यांनी सांगितले