४९ टक्के मतदारांनी बजावला हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 09:44 PM2018-05-30T21:44:20+5:302018-05-30T21:44:30+5:30
भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीत मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिलेल्या मतदारांना निवडणूक आयोगाने मतदानाची संधी दिली. त्यामुळे बुधवारी (दि.३०) रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजता या दरम्यान मतदान घेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीत मतदानाच्या हक्कापासून वंचित राहिलेल्या मतदारांना निवडणूक आयोगाने मतदानाची संधी दिली. त्यामुळे बुधवारी (दि.३०) रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजता या दरम्यान मतदान घेण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील दोन व अर्जुनी-मोरगाव, तिरोडा व गोंदिया या विधानसभा क्षेत्रातील ४९ केंद्रावरील ईव्हीएम बंद पडल्याने मतदान २८ मे रोजी होऊ शकले नाही. परिणामी निवडणूक विभागाने या केंद्रावर फेरमतदान घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार ३९ हजार ५८९ मतदारांपैकी १९ हजार ३३८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी (दि.२८) मतदान घेण्यात आले. मात्र मतदान दरम्यान जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांवरील ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅट मशिनमध्ये बिघाड आला होता. त्याचा मतदान प्रक्रियेवर परिणाम झाला. यातील बहुतांश केंद्रांवरील मशिनची दुरूस्ती करून यंत्रणेने मतदान करवून घेतले होते.मात्र जिल्ह्यातील ३१ केंद्रांवरील तर भंडारा जिल्ह्यातील १८ मतदान केंद्रावरील मशिनची दुरूस्ती होऊ न शकल्यामुळे या केंद्रांवरील मतदान थांबविण्यात आले होते. त्या ठिकाणी बुधवारी मतदान घेण्यात आले. सकाळी ११ वाजतापर्यंत २२.८४४ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर दुपारी ३ वाजतापर्यंत ४१.१४ टक्के मतदान झाले. सायंकाळी ५ वाजता ४५.८६ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी ६ वाजतापर्यंत ४८.८५ टक्के मतदान झाले आहे. अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रातील २ मतदान केंद्रावरील १४९६ मतदारांपैकी ९४३ मतदारांनी मतदान केले. त्याची टक्केवारी ६३.०३ आहे. तिरोडा विधानसभा क्षेत्रातील ८ मतदान केंद्रावर ६ हजार ३६३ मतदारांपैकी ३५३१ मतदारांनी मतदान केले. त्याची टक्केवारी ५५.४९ आहे. तर गोंदिया विधानसभा क्षेत्रातील २१ मतदान केंद्रावरील १९ हजार १८३ मतदारांपैकी ७७५० मतदारांनी मतदान केले. त्याची टक्केवारी ४०.४० आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील ४९ मतदान केंद्रावरील ३९ हजार ५८९ मतदारांपैकी १९ हजार ३३८ मतदारांनी मतदान केले. त्याची टक्केवारी ४८.८५ एवढी आहे.