उपचाराअभावी ५९ एड्स रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 09:51 PM2018-08-26T21:51:06+5:302018-08-26T21:51:37+5:30
एड्सची लागण झालेल्या रुग्णांनी उपचार करण्यास नकार दिल्याने मागील तीन वर्षांत जिल्ह्यात ५९ एड्स रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : एड्सची लागण झालेल्या रुग्णांनी उपचार करण्यास नकार दिल्याने मागील तीन वर्षांत जिल्ह्यात ५९ एड्स रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे एड्स आजाराबाबत अद्यापही जिल्ह्यात जनजागृतीचा अभाव असल्याचे चित्र आहे.
शासनातर्फे एड्स आजाराबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबविली जाते. शिवाय १ ते ७ डिसेंबर दरम्यान एड्स जनजागृती सप्ताह राबवून सर्वच ठिकाणी मार्गदर्शन शिबिर व उपचार पध्दतीची माहिती दिली जाते. मात्र यानंतरही एड्स आजाराबाबत नागरिकांमध्ये जागृकता आली नसल्याचे दिसते. एड्सवर उपचार पध्दती उपलब्ध असून बाधीत झालेल्या रुग्णांनी उपचार न घेतल्याने ५९ रुग्णांचा मृत्यु झाल्याची बाब उघडकीस आली आहे.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एड्स समुदेशन केंद्रातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात २०१५-१६ मध्ये २१, २०१६-१७ मध्ये १८, २०१७-१८ मध्ये १३ आणि जुलै २०१८ पर्यंत ७ एड्स रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यासर्व रुग्णांना एड्सची लागण झाल्याचे चाचणीनंतर स्पष्ट झाले होते. विशेष म्हणजे या रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसीटीसी सेंटरमध्ये नि:शुल्क उपचाराची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
मात्र त्यांनी उपचार न घेतल्याने या रुग्णांचा मृत्यू झाला. तर त्यांच्यापर्यंत पोहचून व मार्गदर्शन करुन उपचारासाठी तयार करण्यात आयसीटीसी सेंटरचे कर्मचारी कमी पडले. एड्स आजाराबाबत अद्यापही भिती असून उपचार करुन घेण्यास रुग्ण संकोच बाळगतात. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलल्या जाते. परिणामी आरोग्य विभागाने अधिक जनजागृती करण्याची गरज आहे.
उपचारा दरम्यान २३४ रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यातील एड्स रुग्णांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे. मागील तीन वर्षांत २३४ एड्स रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद आयसीटीसी सेंटरमध्ये झाली आहे. २०१५-१६ मध्ये ६३, २०१६-१७ मध्ये ७५, २०१७-१८ मध्ये ५८ आणि जुलै २०१८ मध्ये ३८ एड्स रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे या आकड्यानी आरोग्य प्रशासनाची सुध्दा झोप उडाली आहे.
पाच वर्षांत ७६१ एड्स रुग्ण
जिल्ह्यात मागील चार वर्षांत तपासणी दरम्यान ७६१ रुग्णांना एड्सची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. दरवर्षी जिल्ह्यातील एड्स रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने ही बाब चिंताजनक होत आहे. २०१४-१५ मध्ये २६ हजार ८४३ लोकांची तपासणी करण्यात आली. यात २११ एड्स बाधीत आढळले, २०१५-१६ मध्ये २८ हजार ८६९ लोकांची तपासणी करण्यात आली. यात १८२ एड्स बाधीत आढळले, २०१७-१८ मध्ये ३४ हजार २३१ लोकांची तपासणी करण्यात आली. त्यात १६५ एड्स बाधीत आढळले. जुलै २०१८ मध्ये ८ हजार ५८० रुग्णांचीे तपासणी करण्यात आली. त्यात ३४ एड्स बाधीत आढळले.
राष्ट्रीय महामार्ग ठरत आहे कर्दनकाळ
गोंदिया जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ गेला आहे. या मार्गावर सडक अर्जुनी व देवरी तालुक्यातील काही गाव वसलेले आहे. या मार्गावर दिवसभर मुंबई-कलकत्ताकडे जाणाऱ्या मालवाहू वाहनाची वर्दळ असते. याच रस्त्यालगत देहव्यापार मोठ्या प्रमाणात चालतो. त्यामुळेच जिल्ह्यात दरवर्षी एड्स रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग कर्दनकाळ ठरत आहे. सर्वाधिक एड्स बाधीत रुग्ण याच भागातील असल्याचे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
आता सुरू केली शोध मोहीम
तपासणी दरम्यान एड्सची लागण झाल्याचे सिध्द झाल्यानंतर त्यांची आयसीटीसी सेंटरमध्ये नोंद केली जाते. त्यानंतर या रुग्णांचे समुपदेशन करुन उपचार केला जातो. मात्र मागील तीन वर्षांत एड्सची बाधा झालेल्या रुग्णांनी उपचार न घेतल्याने त्यांचा मृत्यु झाला. त्यामुळे एड्सची लागण झालेल्या रुग्णांचा शोध घेवून त्यांना उपचारासाठी प्रेरीत करुन आयसीटीसी सेंटरपर्यंत आणण्याची मोहीम १ जुलै २०१८ पासून राज्यभरात सुरू करण्यात आली असल्याचे आयसीटीसी सेंटरचे पर्यवेक्षक संजय जेणेकर यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.