बनावट दारू प्रकरणात ५ आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:18 AM2021-02-22T04:18:12+5:302021-02-22T04:18:12+5:30
गोंदिया : हलबिटोला येथील अशोक हुपराम गिऱ्हेपुंजे या शेतकऱ्याच्या शेतात बनावट देशी दारू तयार करून त्याचा पुरवठा जिल्हाभरात करणाऱ्या ...
गोंदिया : हलबिटोला येथील अशोक हुपराम गिऱ्हेपुंजे या शेतकऱ्याच्या शेतात बनावट देशी दारू तयार करून त्याचा पुरवठा जिल्हाभरात करणाऱ्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड घालून सहा लाख ७४ हजार ७१० रुपयांचा माल शुक्रवारी (दि.१९) पहाटे जप्त केला होता. यातील आरोपींना शनिवारी (दि.२०) अटक करून येथील न्यायालयात हजर केले असता जिल्हासत्र न्यायालयाने त्यांना २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गुरुवारी (दि.१८) रात्री ११.४५ वाजता हलबिटोला येथील बनावट दारूच्या कारखान्यावर धाड टाकून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सहा लाख ७४ हजार ७१० रुपये किमतीचा माल जप्त केला होता. या प्रकरणात आरोपी हेमंत बन्सीलाल पद्माकर (४२, रा. गोरेगाव), हनीफ रमजान शेख (४२), मेहताब नादर खाँ पठाण (३८), नजीर इस्राईल सय्यद (३०) आशिकअली सवालशॉह सय्यद (३०, सर्व रा. कुऱ्हाडी) यांना शनिवारी अटक करून न्यायालयात हजर केल्यावर त्यांना पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. आरोपींवर भा.दं.वि.च्या कलम ३२८ सहकलम ६५ (ई)(फ), ६७, ८३ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमप्रमाणे गुन्हा नोंद आहे. या पोलीस कोठडीत त्यांची कसून चौकशी सुरू आहे.