'हनी ट्रॅप'मध्ये अडकला तरुण, तोतया पोलिसांनी 'अशी' केली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 04:22 PM2021-12-01T16:22:10+5:302021-12-01T16:53:00+5:30
आधी तरुणाला हनी ट्रॅपमध्ये अडकवले नंतर आपण पोलीस असल्याचे सांगत त्याला नग्न करून मारहाण केली. त्याचा व्हिडिओ शूट करून व्हायरल करण्याची धमकी देत ५ लाखांची खंडणी मागितली.
गोंदिया : तरुणाशी लगट लावून शारीरिक संबंध प्रस्तापित करण्याचे नाटक केले. त्याला नग्न करून त्याचा व्हिडिओ शूट करून व्हायरल करण्याची धमकी देत ५ लाखांची खंडणी मागितली. हे कृत्य करणाऱ्यांनी आपण स्वत: पोलीस असल्याचे सांगून हे कृत्य केले आहे. हॅनीट्रप करणाऱ्या त्या पाच जणांवर रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
गोंदियाच्या बिरजू चौकातील एका ३१ वर्षीय तरुणाला २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता तो मोटारसायकलने रिंगरोड गोंदियाकडे जात असता एका महिलेने त्याला थांबण्याचा इशारा केला. वाहन थांबविल्यावर तिने त्याला अंगूर बगीचा येथे सोडून देण्याची विनंती केली. त्याने सोडून दिल्यावर तिने त्याचा मोबाईल क्रमांक घेतला.
२८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता तिने त्या तरुणाला फोन केला. दुपारी ४ वाजताच्या सुमारास बी. एम.डब्ल्यू बालाघाट रोड येथे भेटल्यावर ती त्याला कटंगीकडे घेऊन गेली. भवानी चौक विजयनगरकडे गेल्यानंतर एका बिल्डिंगमध्ये त्याला नेले. तेथे अन्य एक महिला हजर होती. काही वेळाने तेथे तीन अनोळखी इसम ते असलेल्या खोलीत आले. त्या महिलेने तिन्ही अनोळखी इसमांना त्या तरुणाकडून पैसे घेण्याविषयी सूचना केली. त्यांनी त्या तरुणाला मारपीट करून विवस्त्र केले. त्याची मोबाईलमध्ये शूटिंग केली. ५ लाख रुपये दे अन्यथा तुझा व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी दिली.
आरोपींनी आम्ही पोलीसवाले आहोत असे सांगून त्याला धमकाविले. त्याला मारहाणही केली. सोशल मीडियावर त्याला नग्नावस्थेत दाखविण्याची धमकी दिली. तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुवंशी करीत आहेत.