५ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा निवडणुकीवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 10:19 PM2018-05-23T22:19:36+5:302018-05-23T22:19:36+5:30
वारंवार कंत्राटी कर्मचाऱ्यांवर नामुष्की आणणाऱ्या सरकारच्या विरोधात तीव्र असंतोष व्यक्त करून गोंदिया जिल्हा शासकीय कंत्राटी कर्मचारी महासंघाने भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : वारंवार कंत्राटी कर्मचाऱ्यांवर नामुष्की आणणाऱ्या सरकारच्या विरोधात तीव्र असंतोष व्यक्त करून गोंदिया जिल्हा शासकीय कंत्राटी कर्मचारी महासंघाने भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभेची पोट निवडणूक २८ मे रोजी होत आहे. या निवडणुकीवर गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील ५ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. एका कर्मचाऱ्यामागे ८ नातेवाईक व घरच्या लोकांसोबत असे ४० हजार लोक या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहेत.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत नियमीत करण्यासाठी अनेकवेळा धरणे आंदोलन, मोर्चे काढून स्थानिक आमदार, खासदार, मंत्री यांना निवेदन देण्यात आले. मात्र अद्यापही यावर ठोस निर्णय घेण्यात आला नाही. केवळ आश्वासनावरच कंत्राटी कर्मचाऱ्यांना भागवावे लागले. यामुळे सरकारच्या उदासिन धोरणाला कंटाळून गोंदिया जिल्हा शासकीय कंत्राटी कर्मचारी महासंघाने या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
यानंतरही शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांना विचारात न घेतल्यास २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात बहिष्कार टाकण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष सुनिल तरोणे, उपाध्यक्ष अतूल गजभिये, सचिव विकास कापसे, कोषाध्यक्ष प्रकाश रहमतकर, स्वप्नील अग्रवाल, भागचंद रहांगडाले, कुलदीपीका बोरकर, दिशा मेश्राम, ग्रीष्मा वाहने, राजू येडे, मनोज तिवारी, मनोज बोपचे, जितेंद्र येरपुडे, उमेश भरणे, गजानन धावडे, राजन चौबे, श्रीकांत त्रिपाठी, डी.जी. ठाकरे व इतरांनी दिला आहे. यासंबंधीचे निवेदन सुध्दा निवासी उपजिल्हाधिकारी धार्मिक यांना दिले आहे.