तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात ५० बेड्स उपलब्ध होणार ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:25 AM2021-04-19T04:25:52+5:302021-04-19T04:25:52+5:30
तिरोडा : तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अशातच खासगी व शासकीय रुग्णालयातील बेड्स हाऊसफुल्ल झाल्याने रुग्णांची गैरसोय ...
तिरोडा : तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अशातच खासगी व शासकीय रुग्णालयातील बेड्स हाऊसफुल्ल झाल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेत आमदार विजय रहांगडाले यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयातील बेड्सची संख्या २०वरुन ५० करण्याची मागणी केली होती. त्याला पालकमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला असून, याठिकाणी आता ५० बेड्स उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.
गोंदिया जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तिरोडा तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय येथे कोविड रुग्णांकरिता बेडची सुविधा असून, बेडच्या तुलनेत तालुक्यातील रुग्णसंख्या जास्त आहे. शासकीय रुग्णालयामध्ये बेड फुल झाले आहेत. त्यामुळे बेड्सची संख्या वाढविणे आवश्यक आहे. तालुक्यात ५० बेड, फिरती एक्स - रे मशीन, इसीजी मशीन, १ निरीक्षक, ६ डॉक्टर, ४ वॉर्डबॉय, ६ परिचारिका, ४ सफाई कर्मचारी, २ धुलाई कर्मचाऱ्यांची पदे भरण्याची मागणीही आमदार रहांगडाले यांनी केली होती. पालकमंत्र्यांनी या सर्व सुविधा आठ दिवसात उपलब्ध करुन देण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत. उपजिल्हा रुग्णालय, तिरोडा येथे मागील सहा महिन्यांपासून ५ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. परंतु, तांत्रिक कर्मचाऱ्यांअभावी व्हेंटिलेटर बंद आहेत. ते सुद्धा त्वरित सुरू करण्यात येणार असून, येत्या ८ दिवसात उपजिल्हा रुग्णालय, तिरोडा येथील पाचही व्हेंटिलेटर सुरू होणार असल्याची माहिती आमदार रहांगडाले यांनी दिली.