फुलचूर येथील 50 घरांना चिखलाचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2021 05:00 AM2021-08-06T05:00:00+5:302021-08-06T05:00:08+5:30

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि पोलीस मुख्यालय ही प्रमुख प्रशासकीय कार्यालये याच ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहेत. या कार्यालयांना लागूनच शिव नगर, रामदेव कॉलनी आहेत. शिव नगरमध्ये शासकीय नोकरदारांची वसाहत आहे. ही वस्ती सुमारे १० वर्षापूर्वी तयार झाली. ग्रामपंचायत येथील नागरिकांकडून कर गोळा करते. मात्र पाणी, रस्ते आणि नाल्या अद्यापही या परिसरात तयार झालेले नाहीत. त्यामुळे चिखलाच्या रस्त्यांवरुन ये-जा करावे लागते. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असून शिवनगर परिसरातील रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. 

50 houses in Fulchur surrounded by mud | फुलचूर येथील 50 घरांना चिखलाचा वेढा

फुलचूर येथील 50 घरांना चिखलाचा वेढा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहराचा व्याप दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहराला लागून असलेल्या गावांची व्याप्ती देखील वाढत आहे. आमगाव मार्गावर शहराला अगदी लागून असलेल्या फुलचूर येथे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षक कार्यालये आहेत. याच कार्यालयांना लागून असलेल्या शिवनगरात अनेक घरे आहेत. मागील १० वर्षापासून ही वस्ती असून देखील रस्ते, नाल्या यांचे बांधकाम झाले नाही. परिणामी पावसामुळे रस्ते चिखलाने माखले. या रस्त्यावरुन पायी देखील चालणे कठीण झाले आहे. 
गोंदिया शहर दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे मार्गावर असल्यामुळे या शहराला अधिकच महत्व प्राप्त झाले. जिल्हा मुख्यालय असल्यामुळे आणि येथील बाजारपेठ प्रसिद्ध आहे. परजिल्ह्यातील नागरिक देखील येथे स्थिरावू लागले आहेत. त्यातच आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि इतर शिक्षणाच्या संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांचा देखील येथे ओढा येत आहे. पूर्वी शहरापासून वेगळी असलेली परिसरातील गावांपर्यंत शहराचा विस्तार झाला. त्यामुळे परिसरातील कुडवा, कटंगी, फुलचूर, फुलचूरपेठ, मुर्री आदी गावे आता शहराला जोडली आहेत. त्यातील एक असलेल्या फुलचूर हे गाव ग्रामपंचायत असले तरी त्याचा समावेश शहरातच होतो. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि पोलीस मुख्यालय ही प्रमुख प्रशासकीय कार्यालये याच ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहेत. या कार्यालयांना लागूनच शिव नगर, रामदेव कॉलनी आहेत. शिव नगरमध्ये शासकीय नोकरदारांची वसाहत आहे. ही वस्ती सुमारे १० वर्षापूर्वी तयार झाली. ग्रामपंचायत येथील नागरिकांकडून कर गोळा करते. मात्र पाणी, रस्ते आणि नाल्या अद्यापही या परिसरात तयार झालेले नाहीत. त्यामुळे चिखलाच्या रस्त्यांवरुन ये-जा करावे लागते. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असून शिवनगर परिसरातील रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. 

रस्ता कसला, पाणंद रस्ताच
- शिवनगरातील अकृषक आणि मंजूर ले आऊटवर नागरिकांनी घरांचे बांधकाम केले. त्यामुळे येथे रस्ते आणि इतर सुविधा होणे गरजेचे होते. परंतु ग्रामपंचायतीने रस्त्यावर साधे मुरुम देखील टाकण्याचे सौजन्य दाखविले नाही. त्यामुळे पायवाट येथील नागरिकांना रस्ता मानला आहे. या रस्त्यापेक्षा पांदन रस्ते तरी बरे, अशी गत झाली आहे. 


सरपंचांच्या वॉर्डातच समस्या
- फुलचूर ग्राम पंचायतीच्या हद्दीत पक्की घरे आहेत. नव्यानेच बांधकाम होत असलेल्या घरांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सामान्य फंडात मोठी रक्कम जमा होते. नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे अनेकदा रस्ते आणि नाल्यांसाठी पाठपुरावा केला. मात्र, निधी नसल्याचे तर कधी कोरोनाचे कारण सांगून वेळ मारुन नेली. परंतु लाखो रुपयांच्या घरात येणारा सामान्य फंडातील पैशाचे काय होते, याबाबत बोलण्यास ग्रामपंचायत तयार नाही. उल्लेखनिय म्हणजे शिवनगर वॉर्ड क्रमांक दोनमध्ये येते.

शिवनगर येथील रस्त्यासंदर्भात तक्रारी आलेल्या आहेत. त्यासंदर्भात सरपंच यांच्याशी देखील चर्चा झाली आहे. रस्त्याचे बांधकाम प्रस्तावित असून पावसाळ्यानंतर बांधकाम हाती घेण्यात येणार आहे. तोपर्यंत स्थानिकांनी ग्राम पंचायतीला सहकार्य करावे.
- टी.डी. बिसेन, ग्रामविकास अधिकारी
गावातील नागिरकांकडून नियमित कराचा भरणा करण्यात येते. कराच्या माध्यमातून लाखो रुपये ग्रामपंचायतीच्या तिजोरीत जमा होतात. मात्र, ग्रामपंचायत त्यान नागरिकांना मुलभूत सोयी पुरविण्याकडे दुर्लक्ष करत आहे. 
- मुकेश लिल्हारे, माजी सदस्य.
 

Web Title: 50 houses in Fulchur surrounded by mud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.