कृषी केंद्रातून ५० हजार रुपये लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 12:52 AM2018-09-06T00:52:11+5:302018-09-06T00:52:36+5:30
येथील देवरी-आमगाव मार्गावरील श्री अग्रसेन चौकाजवळ असलेल्या सालासर अॅग्रो एजन्सी या कृषी केंद्रातून एका पुरुष, महिला व लहान मुलगी अशा तिघांच्या टोळीने दुकानात बसलेल्या रामअवतार अग्रवाल यांच्या पत्नीचे लक्ष विचलित करुन काऊंटरमधील ५० हजार रुपये घेवून पोबारा केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : येथील देवरी-आमगाव मार्गावरील श्री अग्रसेन चौकाजवळ असलेल्या सालासर अॅग्रो एजन्सी या कृषी केंद्रातून एका पुरुष, महिला व लहान मुलगी अशा तिघांच्या टोळीने दुकानात बसलेल्या रामअवतार अग्रवाल यांच्या पत्नीचे लक्ष विचलित करुन काऊंटरमधील ५० हजार रुपये घेवून पोबारा केला. ही घटना मंगळवारी (दि.४) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार आमगाव-देवरी मार्गावर सालासर अग्रो एजन्सी या कृषी केंद्रात मंगळवारी (दि.४) सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास अग्रवाल यांची पत्नी ज्योती अग्रवाल या दुकानात बसल्या होत्या. दरम्यान कारने आलेल्या एक पुरुष, महिला व लहान मुलगी असे तिघे जण दुकानात येऊन त्यांनी बियाणांचे पाकीट मागितले. आम्ही दुबईवरुन आलो आहोत. असे सांगत त्या पुरुषाने पँटमधून पर्स काढले व आमच्या दुबईत अशाप्रकारचे नोट असतात म्हणून दाखवू लागला. त्यानंतर तुमच्या देशात सर्वात मोठी नोट कोणती व कशी दिसते म्हणून ज्योती यांना विचारु लागला. तेव्हा ज्योती यांनी दोन हजार रुपयाचे नोट दाखविण्याकरीता दुकानातील गल्ला उघडला. तेवढ्यात सोबत असलेल्या त्या महिलेने लहान मुलीकरीता पिण्याचे पाणी मागितले, तेव्हा ज्योती या पाणी देण्याकरीता वळताच त्या पुरुषाने काऊंटरमध्ये ठेवलेले ५० हजार रुपयांचे एक नोट बंडल खिशात टाकले.
त्यानंतर ते कारने घटना स्थळावरुन पसार झाले. ज्योती अग्रवाल यांनी काऊंटर उघडून पाहिल्यावर त्यात ५० हजार रुपयांचे एक बंडल नसल्याचे लक्षात आले. त्यांनी त्वरीत पतीला फोन करुन याची माहिती दिली. त्यानंतर रामअवतार अग्रवाल यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर देवरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली. दरम्यान अशीच घटना मंगळवारी (दि.४) साकोली नजीकच्या एकोडी पेट्रोल घडल्याची माहिती आहे. टोळीचा शोध देवरी पोलीस घेत आहे.