५०० शेतकऱ्यांचे आमदाराच्या घरासमोरच ठिय्या आंदोलन; भर उन्हात रस्ता रोखून धरला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 10:51 AM2023-08-29T10:51:10+5:302023-08-29T10:54:26+5:30
मार्केटिंग अधिकाऱ्यांवर रोष
गोंदिया : तालुक्यातील चुटीया येथील श्रीराम अभिनव सहकारी संस्थेने खरीप व रब्बी हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या २८ हजार क्विंटल धानाची अफरातफर करून परस्पर विल्हेवाट लावली. यामुळे या शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणारे ५०० शेतकरी अडचणीत आले आहेत. या शेतकऱ्यांचे ५ कोटी ७२ लक्ष रुपयांचे चुकारे न मिळाल्याने अखेर संतप्त झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी सोमवारी (दि.२८) रोजी अपक्ष आ. विनोद अग्रवाल यांच्या घरासमोर भरउन्हात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. संतप्त शेतकऱ्यांनी जोपर्यंत पैसे मिळणार नाही तोपर्यंत इथून उठणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
गोंदिया तालुक्यातील चुटीया व परिसरातील शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे मागील तीन महिन्यांपासून थकले आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. तीन महिन्यांपासून वारंवार जिल्हा पणन कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांना आश्वासन देण्यात येत आहे. तर, शेतकरी चुकाऱ्यांसाठी जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याकडे चकरा मारीत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
अडीच महिन्यांपासून चुटीया येथील श्रीराम अभिनव सहकारी संस्थेवर धान विक्री करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे ५ कोटी ७२ लाख रुपये पणन कार्यालयाने रोखून ठेवले आहेत. शेतकऱ्यांनी वारंवार पणन अधिकारी, जिल्हाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधींना विनंती करून धानाची रक्कम देण्याची मागणी केली. परंतु, आश्वासनांच्या पलीकडे काहीच मिळत नसल्याने चुटीया येथील ५०० शेतकऱ्यांनी आ. विनोद अग्रवाल यांच्या घरासमोर सोमवारी ठिय्या आंदोलन सुरू केले. पैसे मिळणार नाही तोवर आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, अशी शेतकऱ्यांची भूमिका होती.
संचालकांना अटक का नाही?
फेडरेशनने श्रीराम अभिनव सहकारी संस्थेच्या ११ संचालकांसह ४ कर्मचारी अशा एकूण १५ जणांवर फसवणुकीचा गुन्हा गोंदिया शहर पोलिस ठाण्यात दाखल केला आहे. फेडरेशनने कायदेशीर कारवाई केली असली तरी या संस्थेच्या केंद्रावर धानाची विक्री करणारे ५०० शेतकरी अडचणीत आले आहेत. गुन्हा दाखल तर झाला मात्र त्या संचालकांना अटक का करण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
जप्तीच्या कारवाईचे काय झाले?
श्रीराम अभिनव सहकारी संस्थेच्या संचालकांनी २८ हजार क्विंटल धानाची अफरातफर करून ५ कोटी ७६ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. धानाची अफरातफर केलेल्या रकमेची वसुली करण्यासाठी येत्या दोन-तीन दिवसांत संपत्ती जप्तीची कारवाई सुरू केली जाणार आहे, असे जिल्हा मार्केटिंगचे विवेक इंगळे यांनी शेतकऱ्यांना सांगितले होते. पण, त्यांनी कुठलीच कारवाई केली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे.
फेडरेशन सोडून माझ्या कार्यालयासमोर आंदोलन का?
माझ्या विधानसभा क्षेत्रातील शेतकरी अडचणीत राहू नये यासाठी मी मार्केटिंग अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पोलिस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु, आरोपींना पकडण्याचे काम पोलिसांचे आहे. त्यांनी आरोपींना शोधावे. मी जनतेचा आमदार आहे. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी मी तत्पर आहे. तुमचे माझ्यावर पैसे नाहीत असतील तर ते मी आताच परत करतो. तुमचे पैसे सरकारवर आहेत, त्यासाठी मार्केटिंग अधिकाऱ्यांच्या किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करा मी स्वत: तुमच्यासोबत आहे.
- विनोद अग्रवाल, आमदार