घाटांनी दिले ५.२५ कोटी
By admin | Published: January 20, 2015 10:37 PM2015-01-20T22:37:11+5:302015-01-20T22:37:11+5:30
जिल्ह्यातील लिलावासाठी पात्र ठरलेल्या ३७ घाटांपैकी ई-टेंडरिंगद्वारे २६ घाट लिलावात गेले. त्यांची शासकीय किंमत (किमान अपेक्षित) १ कोटी ३३ लाख ७६ हजार रुपये होती.
अपेक्षेपेक्षा चौपट किंमत : ११ घाटांसाठी पुन्हा होणार लिलाव
गोंदिया : जिल्ह्यातील लिलावासाठी पात्र ठरलेल्या ३७ घाटांपैकी ई-टेंडरिंगद्वारे २६ घाट लिलावात गेले. त्यांची शासकीय किंमत (किमान अपेक्षित) १ कोटी ३३ लाख ७६ हजार रुपये होती. मात्र प्रत्यक्षात त्यांना या किमतीपेक्षा चार पट अधिक म्हणजे ५ कोटी २५ लाख २१ हजार ९५ रुपये किंमत मिळाली. त्यामुळे उशिरा लिलाव प्रक्रिया झाली असली तरी चांगली किंमत मिळाल्याने गतवर्षीच्या तुलनेत महसुलात भर पडणार आहे.
जिल्ह्यात एकूण १०७ रेतीघाट आहेत. गेल्यावर्षी लिलावात गेलेल्या घाटांची मुदत सप्टेंबर अखेरला संपली. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून रेतीमाफियांकडून चोरट्या मार्गाने रेतीचा उपसा सुरू होता. त्यापैकी भूजल सर्व्हेक्षण विभागाने ४९ घाटांना लिलावास पात्र ठरविले होते. मात्र भौगोलिक अडचणींमुळे ४ रेतीघाटांमधून रेतीचा उपसा करणे कठीण असल्यामुळे जिल्हा खनिकर्म विभागाकडून ४५ घाटांचाच प्रस्ताव पर्यावरण विभागाकडे पाठविण्यात आला होता. त्यापैकी ३७ घाटांना मंजुरी मिळाली. त्यातून २ कोटी ८२ लाख ५५ हजार ५०० रुपये किमान महसूल मिळणे अपेक्षित होते. मात्र २६ घाटांमधूनच चौपट महसूल शासनाला मिळत आहे.
गेल्यावर्षी ४४ रेतीघाट पात्र ठरले होते. त्यातून ४ कोटी १५ लाखांचा महसूल मिळणे अपेक्षित होते. मात्र तीन वेळा ई-टेंडरिंग केल्यानंतरही त्यापैकी केवळ २७ घाटांचा लिलाव होऊ शकला. त्यातून प्रत्यक्षात २ कोटी २० लाखांचा महसूल शासनाला मिळाला होता. त्या तुलनेत यावर्षी महसुलात चांगलीच वाढ झाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)