५३४४ जणांना गुरूजींचे वेध
By admin | Published: January 17, 2016 01:35 AM2016-01-17T01:35:01+5:302016-01-17T01:35:01+5:30
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सन २०१५ साठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा शनिवारी रोजी घेण्यात आली.
गोंदिया : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सन २०१५ साठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा शनिवारी रोजी घेण्यात आली. या परीक्षेत डीएडच्या ३ हजार ५७७ तर बीएडच्या १ हजार ७६७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. जिल्ह्यातील २४ केंद्रावरुन ही परीक्षा घेण्यात आली आहे.
ही परीक्षा सुरक्षित पार पडावी, यासाठी सात पथके तयार करण्यात आली होती. या परीक्षा केंद्रावर या पथकाची निगरानी होती. मात्र परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घण्यात आली. यापूर्वी १५ डिसेंबर २०१३ ला पहिली परीक्षा व १४ डिसेंबर २०१४ ला दुसरी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर सन २०१५ या वर्षासाठी आज (दि.१६) तिसरी परीक्षा घेण्यात आली. गोंदिया जिल्ह्यात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी शहरातील २४ केंद्राची निवड करण्यात आली होती. यामध्ये डी.टी.एड. पात्रताधारक ३ हजार ८३० विद्यार्थ्यांसाठी १५ केंद्र तर बी.एड. पात्रताधारक १ हजार ८९० विद्यार्थ्यांसाठी ९ केंद्राची निवड करण्यात आली होती. परीक्षा सकाळ व दुपार अशा दोन पाळीत घेण्यात आली आहे. यामध्ये रविंद्रनाथ टागोर बंगाली हायस्कूल येथे उर्दू व इंग्रजी माध्यमासाठी दोन केंद्र होते त्यात डी.एड.चे ४० तर बी.एड.चे ५९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. विवेक मंदिर शाळेत एका केंद्रावरून ६०० विद्यार्थी, बी.एन.आदर्श सिंधी हायस्कूल येथून ८०० विद्यार्थी, मनोहर म्यु. हॉयर सेकंडरी शाळेतून ६५० विद्यार्थी, मनोहरभाई कनिष्ठ महाविद्यालयातून ४०० विद्यार्थी, राजस्थानी कन्या हायस्कूल येथून ५००, महावीर मारवाडी शाळेत ७००, गुजराती नॅशनल हायस्कूल ४०६, एस.एस.गर्ल्स हायस्कूल येथून २००, सरस्वती महिला विद्यालय पुनाटोली २७५, जे.एम.हायस्कूल पुनाटोली २५०, जानकीदेवी चौरागडे हायस्कूल २००, एस.एस.गर्ल्स महाविद्यालयात ३०० व गोंदिया पब्लीक शाळा या केंद्रावर ३४० विद्यार्थ्यानी परीक्षा दिली. एकूण २४ केंद्राच्या माध्यमातून ५ हजार ७२० विद्यार्थी परीक्षेला बसणार होते. परंतु डीएडचे ३ हजार ५७७ व बीएडचे १ हजार ७६७ असे एकूण ५ हजार ३४४ जणांनी परीक्षा दिली आहे. या परीक्षेला डीएडचे २५३ तर बीएडचे १२३ परीक्षार्थी गैरहजर होते.
प्रत्येक केंद्रावर परीक्ष सुरळीत पार पाडण्यासाठी ६ झोनल अधिकारी, २ सहायक परीक्षक तर प्रत्येक केंद्रावर १ केंद्र संचालक होते. २५ विद्यार्थ्यांमागे १ समवेक्षक तर १२५ विद्यार्थ्यांमध्ये १ पर्यवेक्षकाची निवड करण्यात आली होती. मागील ३ वर्षापासून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेतली जात आहे. मात्र यापूर्वीच्या घेण्यात आलेल्या दोन्ही परीक्षेपेक्षा परीक्षार्थ्यांची संख्या रोडावली आहे. या परीक्षेमुळे डीटीएड व बीएडच्या विद्यार्थ्यांमधील गुणांची चाचपणी केली जाणार आहे, अशी माहिती उपशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी यांनी दिली आहे.(तालुका प्रतिनिधी)
परीक्षेसाठी सात भरारी पथक
महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा जिल्ह्यातील २४ केंद्रावरून घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी शिक्षण विभागाच्या वतीने सात भरारी पथके तयार करण्यात आली होती. यात जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यपालन अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी,माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी निरंतर शिक्षण व डॉयट प्राचार्य यांचे प्रत्येकी एक असे सात भरारी पथक तयार करण्यात आले होते.