मेडिकल कॉलेजवर ५५ लाखांचे विद्युत बिल थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:27 AM2021-03-25T04:27:36+5:302021-03-25T04:27:36+5:30
गोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपल्या विविध कामांमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध विभागात १५ ...
गोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपल्या विविध कामांमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध विभागात १५ ते १६ विद्युत जोडणी असल्याची माहिती आहे. हे वीजबिल ५ ते ६ महिन्यांपासून भरलेले नाही. यामुळे गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे ५५ लाख रुपये विद्युत बिल थकीत आहे. विद्युत महावितरण कंपनीने वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला नोटीस बजावली आहे. वीज कनेक्शन कापण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काही दिवसापूर्वी मेडिकल कॉलेज वसतिगृहाचा वीजपुरवठा खंडित केला होता. त्यावर मेडिकल कॉलेजच्या वैद्यकीय अधिष्ठाता यांनी आठ लाख रुपये भरले. अद्यापपर्यंत अनुदान सरकारकडून देण्यात आले नाही. त्यामुळे विजेचे बिल भरणे शक्य झाले नाही, हे वैद्यकीय अधिष्ठाता यांनी सांगितले. कोरोना संसर्गामुळे आरोग्य सुविधा प्राथमिक यादीमध्ये ठेवल्या गेल्या आहेत. परंतु असे असूनही वैद्यकीय प्रशासनाच्या दुर्लक्ष कारभारावर प्रकाश टाकत अनेक महिने वीजबिल जमा झाले नाही. जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू आहे. यासह शासकीय महिला रुग्णालयाजवळील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वसतिगृहे सुरू आहेत. काही दिवसात महाविद्यालयात परीक्षा सुरू होत आहे पण वसतिगृहाची वीज वाहिनी बिघडल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाली.
कोट
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला गेल्या काही महिन्यांपासून आरोग्य विभागाकडून अनुदान मिळाले नाही, त्यामुळे वीजबिल व अन्य बिले भरली जाऊ शकली नाहीत, यासाठी लवकरात लवकर अनुदान द्यावे, अशी मागणी आरोग्य संचालकांना पत्र देखील देण्यात आले आहे. थकबाकीची बिले भरता येतात तसेच महावितरणला अनुदान मिळाल्याबरोबर वीजबिल भरले जाईल.
डॉ. नरेश तिरपुडे, वैद्यकीय अधिष्ठाता