५५ हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 01:42 AM2017-08-12T01:42:16+5:302017-08-12T01:42:40+5:30

येत्या १५ आॅगस्टला विद्यार्थी गणवेशात ध्वजारोहणाला उपस्थित राहतील, असा दावा जिल्हा परिषद शिक्षण विभागाने केला होता.

55 thousand students deprived of uniform | ५५ हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित

५५ हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित

Next
ठळक मुद्देशिक्षण विभागाने झटकले हात : केवळ २५ हजार विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा

अंकुश गुंडावार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येत्या १५ आॅगस्टला विद्यार्थी गणवेशात ध्वजारोहणाला उपस्थित राहतील, असा दावा जिल्हा परिषद शिक्षण विभागाने केला होता. पण, एकूण ७७ हजार विद्यार्थ्यांपैकी आत्तापर्यंत केवळ २५ हजार विद्यार्थ्यांच्या बँका खात्यात पैसे जमा करण्यात आले. परिणामी ५५ हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित असून शिक्षण विभागाने केलेला दावा देखील फोल ठरला आहे.
शासनातर्फे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क गणवेश दिले जाते. पूर्वी गणवेशाची रक्कम शिक्षण विभाग व सर्वशिक्षा अभियानाकडे जमा केली जात होती. त्यांच्यामार्फत गणवेशाचे वितरण केले जात होते. पण, यावर्षीपासून शासनाने यात बदल करित गणवेशाची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँका खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या ७७ हजार ३८२ आहे. यापैकी आत्तापर्यंत २५ हजार विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडून त्यांच्या खात्यामध्ये गणवेशाची रक्कम जमा करण्यात आली. शिक्षण विभागाने जिल्ह्यातील १०९६ शालेय व्यवस्थापन समित्यांच्या बँक खात्यामध्ये एकूण ३ कोटी ९ लाख ५२ हजार रुपयांची रक्कम पंधरा दिवसांपूर्वीच जमा केल्याचा दावा केला आहे. मात्र, अद्यापही ५५ हजार विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडलेच नसल्याची माहिती आहे. परिणामी हे सर्व विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत. १५ आॅगस्टला चार दिवसांचा कालावधी शिल्लक असला तरी सलग चार दिवस सुट्टयांमुळे या कालावधीत विद्यार्थ्यांना बँकेत खाते उघडता येणार नाही. परिणामी १५ आॅगस्टला गणवेशात ध्वजारोहणाला उपस्थित राहण्याचे हजारो विद्यार्थ्यांचे स्वप्न अपूर्णच राहणार असल्याचे चित्र आहे.
चारशे रुपयांत दोन गणवेश शिवायचे कसे
शासनाने विद्यार्थ्यांना दोन गणवेश खरेदीसाठी प्रती विद्यार्थी ४०० रुपये या प्रमाणे निधी उपलब्ध करुन दिला. मात्र गणवेशाचे कापड आणि शिलाईचा खर्च हा सातशे रुपयांच्यावर आहे. त्यामुळे आधीच गरिबीत जीवन जगत असलेल्या पालकांसमोर चारशे रुपयांत दोन गणवेश खरेदी करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शालेय व्यवस्थापन समितीकडे बोट
जि. प. शिक्षण विभाग व सर्व शिक्षा अभियानाने शासनाच्या निर्देशानुसार गणवेशासाठी आलेला निधी शालेय व्यवस्थापन समित्यांच्या खात्यात जमा केला. मात्र यानंतर तो निधी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये वेळीच जमा होईल. यासाठी कसलेच नियोजन केले नाही.
बँकेच्या सलग सुट्यांनी अडचण
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सर्वाधिक शेतकºयांची मुले शिक्षण घेत आहेत. मात्र सध्या शेतीची कामे सुरू असल्याने ते त्यामध्ये व्यस्त आहे. थोडी ऊसंत मिळाली की बँकेत जाऊन खाते उघडू अशी त्यांची मानसिकता होती. मात्र शनिवार ते मंगळवारपर्यंत बँका सलग चार दिवस बंद असल्याने विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
 

Web Title: 55 thousand students deprived of uniform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.