५५१ यशस्वी शस्त्रक्रिया
By admin | Published: May 25, 2016 02:01 AM2016-05-25T02:01:26+5:302016-05-25T02:01:26+5:30
गरजू, गरिबांसाठी वरदान ठरलेल्या लाईफलाईन एक्सप्रेसमध्ये ४ ते २४ मे दरम्यान रूग्णांची तपासणी करून निवडक रुग्णांची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
लाईफ लाईन एक्सप्रेस : २१ दिवसांत ३१२६ जणांना लाभ
गोंदिया : गरजू, गरिबांसाठी वरदान ठरलेल्या लाईफलाईन एक्सप्रेसमध्ये ४ ते २४ मे दरम्यान रूग्णांची तपासणी करून निवडक रुग्णांची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या २१ दिवसांच्या कालावधीत ३ हजार १२६ रूग्णांनी सेवा घेतली असून ५५१ यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.रवि धकाते यांनी दिली.
गोंदिया जिल्ह्याच्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी गोंदियात ४ मे पासून लाईफ लाईन एक्सप्रेस आली. या एक्सप्रेसची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने घेतलेल्या मेहनतीमुळे अवघ्या २१ दिवसात या लाईफलाईन एक्सप्रेसचा लाभ ३१२६ रुग्णांनी घेतला. नेत्ररोग, कानाचे विकार, पोलिओ, दातांचे परीक्षण व उपचार, महिलांचे स्तन, गर्भाशय, ग्रीवा कर्करोग परीक्षण व त्यावर उपचार करण्यात आला. मिरगी व आकडीचाही उपचार करण्यात आला. लाईफ लाईन एक्सप्रेसमधील सेवा घेण्यासाठी रूग्णांना कसलाही त्रास होणार नाही यासाठी त्यांच्या नास्ता, पाण्याची सोय व त्यांना लाईफ लाईन एक्सप्रेसच्या स्थळी जाण्यासाठी केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयातून १०८ ची सेवा मोफत देण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)
२०३ जणांना नवदृष्टी
लाईफ लाईन एक्सप्रेसमध्ये नेत्र तपासणीसाठी १२०९ रूग्णांनी नोंदणी केली. त्यातील २०३ रूग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून त्यांना नवदृष्टी देण्यात आली.
अस्थीरोगाच्या ९९ रूग्णांनी नोंदणी केली होती. तर २३ जणांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. फाटलेले ओठ व भाजणाऱ्यांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी ७२ जणांची नोंदणी करण्यात आली होती. त्यातील १५ जणांची निवड करून शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
गर्भाशयाच्या कर्करोगाची १२० महिलांनी तपासणी केली. १८० मिरगीच्या रूग्णांचा औषधोपचार करण्यात आला. दंत चिकीत्सेसाठी ८६६ जणांची नोंदणी करण्यात आली असून २५० जणांची लघु शस्त्रक्रिया करण्यात आली. कानाचे विकार असलेल्या ५८० जणांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६० जणांच्या कानाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
आज होणार समारोप
लाईफलाईन एक्सप्रेसचा २५ मे रोजी सकाळी १०.३० वाजता समारोपीय कार्यक्रम उद्घाटन झालेल्या ठिकाणीच आयोजित करण्यात आला आहे. खा.नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.रवी धकाते उपस्थित राहणार आहेत.
रूग्णांच्या सेवेसाठी लाईफलाईन एक्सप्रेस महत्वाची ठरली. भिषण उष्णता असतानाही उपचारासाठी आलेल्या रूग्णांची गर्दी बाहेरून आलेल्या तज्ज्ञांनाही आश्चर्यचकीत करणारी होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात लाभ घेणे म्हणजे या उपक्रमाचे फलितच आहे.
डॉ.रवी धकाते जिल्हा शल्यचिकीत्सक