खरिपासाठी ५६ हजार क्विंटल बियाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 09:36 PM2018-04-26T21:36:05+5:302018-04-26T21:36:05+5:30
तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेला गोंदिया जिल्ह्याचे लागवड क्षेत्र २ लाख २० हजार २४६ हेक्टर आहे. परंतु यातील अर्ध्यापेक्षा कमी म्हणजेच ९८ हजार ६१९ हेक्टर शेती ही सिंचनाखाली आहे. उर्वरित शेती कोरडवाहू आहे.
नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेला गोंदिया जिल्ह्याचे लागवड क्षेत्र २ लाख २० हजार २४६ हेक्टर आहे. परंतु यातील अर्ध्यापेक्षा कमी म्हणजेच ९८ हजार ६१९ हेक्टर शेती ही सिंचनाखाली आहे. उर्वरित शेती कोरडवाहू आहे. लागवडीचे क्षेत्र मोठे असले तरी गोंदिया जिल्ह्यात १ लाख ९१ हजार ७१५ हेक्टर शेतीतच खरिपाची लागवड केली जाते. या खरीपासाठी कृषी विभागाने ५५ हजार ५०० क्विंटल बियाणांची मागणी केली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. जिल्ह्यातील २ लाख ८६ हजार ७५ कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीवर चालत आहे. यंदा खरीप हंगामासाठी बियाणांची मागणी करण्यात आली. त्यात भाताचे वाण मागवितांना महाबीज कडून २५ हजार क्विंटल तर खासगी कंपन्यांकडून ३० हजार ५०० क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली. तूर महाबीज कडून ३५० क्विंटल तर खासगी कंपन्यांकडून ३५० क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली. मुंग महाबीज कडून ५ क्विंटल तर खासगी कंपन्यांकडून ५ क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली. उडीद महाबीज कडून ५ क्विंटल तर खासगी कंपन्यांकडून ५ क्विंटल, ढेंचा व इतर महाबीज कडून ३०० क्विंटल तर खासगी कंपन्यांकडून ४५ क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली. सन २०१८ च्या खरीपासाठी महाबीज कडून एकूण २५ हजार ६६० क्विंटल तर खासगी कडून ३० हजार ९०५ क्विंटल अशी ५६ हजार ५६५ क्विंटल बियांणे मागविण्यात आली.
शेतकऱ्यांनी कोणती खते घ्यावीत, कोणती घेऊ नये खते व बियाणे घेतांना कोणती काळजी घ्यावी यासाठी कृषी विभागामार्फत जनजागृती केली जात आहे. गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदीस करा, बनावट भेसळयुक्त खते खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेम्याकडून पावतीसह खरेदी करा, खतांच्या खरेदीची पावती पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावी.
ही काळजी घ्या
बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदीस प्राधान्य द्या, बनावट, भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून पावतीसह खरेदी करा, पावतीवर बियाण्याचा संपूर्ण तपशील जसे पीक, वाण, संपूर्ण लॉट नंबर बियाणे कंपनीचे नाव, किंमत, खरेरीदाराचे संपूर्ण नाव व पत्ता, विक्रेत्यांचे नाव इत्यादी नमूद करावे. रोख किंवा उधारीची पावती घ्यावी. खरेदी केलेल्या बियाणांचे वेण्डन/पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. खरेदी केलेले बियाणे त्या हंगामासाठी शिफारस केल्याची खात्री करावी. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणांची पाकीटे सिलबंद, मोहोरबंद असल्याची खात्री करा. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकीटवरची अंतीम मुदत पाहून घ्यावे.
६१ हजार ४२२ मेट्रिक टन खाताची मागणी
सन २०१८-१९ या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने ६१ हजार ४२२ मेट्रीक टन खताची मागणी शासनाकडे केली आहे. त्यात युरीया २९ हजार ५७० मेट्रीक टन, डीएपी २ हजार ५९७ मेट्रिक टन, एमओपी ५६४ मेट्रिक टन, एसएसपी १० हजार ४०७ मेट्रिक टन, संयुक्त खते १० हजार २८४ मेट्रिक टन, मिश्र खते ८ हजार मेट्रिक टनची मागणी करण्यात आली आहे.
भेसळीची शंका दूर करण्यासाठी खताची पाकीटे व गोणी सिलबंद मोहोरबंद असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. कमी वजनाच्या निविष्ठा छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री होत असतील तर जवळच्या कृषी विभागाच्या कर्मचाºयांशी संपर्क साधावे.
-महेंद्र मडामे
मोहिम अधिकारी, जि.प.गोंदिया