५७ हजार ४७३ महिलांना नवदिशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2017 12:13 AM2017-01-15T00:13:14+5:302017-01-15T00:13:14+5:30
महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्ह्यातील गरीब, आदिवासी, गरजू, विधवा व परित्यक्ता महिलांना संघटीत करून त्यांच्या जीवनाला नवीन दिशा देण्याचे काम करीत आहे.
सात तालुक्यात ४४६१ बचत गट : शिक्षण, संपत्ती व सत्तेतील सहभागासाठी माविमंचा पुढाकार
नरेश रहिले गोंदिया
महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्ह्यातील गरीब, आदिवासी, गरजू, विधवा व परित्यक्ता महिलांना संघटीत करून त्यांच्या जीवनाला नवीन दिशा देण्याचे काम करीत आहे. जिल्ह्याच्या सात तालुक्यातील ४२२ गांवांमध्ये आतापर्यंत ४ हजार ४६१ महिला बचत गट तयार करण्यात आले आहे. यातून ५७ हजार ४६३ महिलांना आधार देण्याचे काम होत आहे. माविमंच्या सहकार्याने महिला आता आत्मनिर्भर होत आहेत.
तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (एमएसआरएलएम), राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान (एनयूएलएम) च्या माध्यमातून बचत गटाचे काम सुरू आहे. महिलांच्या आर्थिक, सामाजिक, राजनितिक सक्षमीकरण, विकासात महिलांचा सहभाग वाढविणे व उपजीविकाच्या साधनात वाढ करून कुटुंबाची आर्थिक मिळकत वाढविण्याच्या उद्देशातून ३८० ग्राम संस्था गठीत करण्यात आल्या आहेत. त्यातून विविध व्यवसायांची उभारणी करून स्वयंरोजगार साधला आहे.
गोंदिया शहरात २५० बचत गट
माविमंच्या माध्यमातून शहरातील गरीब कुटुंबाचा बचत गटात समावेश करण्यासाठी बचत गट तयार करणे, त्यांना सक्षम करणे, बचत गटांना मोठ्या गटांना जोडणे, सुक्ष्म आर्थिक पुरवठा, विमा सेवा व उपजीविकेच्या माध्यमातून आर्थिक स्तर सुधारण्यासाठी योजना सुरू करण्यात आली. गोंदिया नगर परिषदअंतर्गत २५० स्वयंसहायता बचत गट तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले. सन २००७ पासून सुरू तेजस्विनी अंतर्गत स्वयंसहायता बचत गट लोकसंस्था म्हणून गठीत करणे, सुक्ष्म कर्ज पुरवठा, उपजीविका, उद्योजकता विकास, महिला सक्षमीकरण व सामाजिक समानतेचे काम केले जात आहे.