५८१ शाळांना हवी सुरक्षाभिंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 10:03 PM2018-07-21T22:03:01+5:302018-07-21T22:04:39+5:30
जिल्हा परिषदेच्या शाळांना वर्गखोल्यांची गरज असतानाच सुरक्षा भिंतीचीही गरज असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील ५८१ शाळांना सुरक्षाभिंत हवी असून यातील काही शाळांतील सुरक्षाभिंत तुटलेली आहे. तर काहींना तारांचे कुंपन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा परिषदेच्या शाळांना वर्गखोल्यांची गरज असतानाच सुरक्षा भिंतीचीही गरज असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील ५८१ शाळांना सुरक्षाभिंत हवी असून यातील काही शाळांतील सुरक्षाभिंत तुटलेली आहे. तर काहींना तारांचे कुंपन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, जिर्ण वर्गखोल्या व सुरक्षाभिंतीचा अभाव या दोन्ही बाबी विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचे आहे. मात्र तरिही जिल्हा परिषदेचे या गंभीर बाबींकडे सपशेल दुर्लक्ष आहे.
जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा डिजीटल झाल्या असा उदोउदो करण्यात आला. शासनाची कवडीही न लागता लोकांच्या खिशातून पैसा काढून या शाळा डिजीटल करण्यात आल्या. प्रत्येक शाळेतील एकतरी खोली डिजीटल असावी यासाठी शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण विभागाशी संबधीत अधिकारी, पाधिकारी व कर्मचारी यांचा आग्रह होता. आपली मुले ज्या शाळेत शिकत आहेत त्या शाळेतील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळेल यासाठी लोकांनी स्वत:च्या खिशातील पैसे डिजीटल शाळांसाठी दिले. यातुनच जिल्ह्यातील संपूर्ण शाळा डिजीटल झाल्यात.
परंतु वास्तविक परिस्थीती पाहता ‘पुढे पाठ- मागे सपाट’ हीच स्थिती जिल्ह्यात आहे. गोंदिया जिल्ह्यातील १०६९ शाळांपैकी फक्त ४०० शाळांमध्ये पक्की सुरक्षाभिंत आहे. ३६ शाळांची सुरक्षाभिंत तुटलेली आहे. शाळेची सुरक्षाभिंत म्हणून ४२ शाळांमध्ये फक्त तारांचे कुंपन लावण्यात आले. तर १० शाळांच्या सुरक्षाभिंतीचे काम सुरू आहे. सुरक्षाभिंतीची मागणी करूनही जिल्हा परिषदेने सुरक्षाभिंतीची सोय मागील अनेक वर्षांपासून करून दिली नाही. परिणामी, त्याचा पर्याय म्हणून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने आपापल्या शाळेत मेहंदीच्या झाडाचे कुंपन तयार केले.
जिल्ह्यातील १३२ शाळांमध्ये मेहंदीच्या झाडाचे कुंपन आहे. १६३ शाळांमध्ये सुरक्षाभिंतच नाही. ६ शाळांमध्ये सुरक्षाभिंत म्हणून इतर सोय करण्यात आली. २८० शाळांच्या आजूबाजूला अर्ध्या परिसरात घरे असल्यामुळे त्या शाळांची अर्धी सुरक्षा आपोआपच झाली. परंतु अर्धी सुरक्षा वाऱ्यावर आहे. सुरक्षाभिंती अभावी विद्यार्थ्यांना कधीही धोका होण्याची शक्यता असते. अनेक ठिकाणी शाळा तलावाच्या काठावर आहेत. काही ठिकाणी विद्युत डीपीच्या जवळ आहेत. काही शाळा पहाडावर आहेत. विद्यार्थ्यांना धोका होऊ नये यासाठी प्रत्येक शाळेला सुरक्षाभिंतीची गरज आहे.
यासंदर्भात शाळेकडून जि.प.सदस्य, शिक्षण सभापती, जि.प. अध्यक्षांना वारंवार मागणी केली जाते. परंतु गोंदिया जिल्ह्यातील ५८१ शाळा सुरक्षाभिंत विना आहेत.
सर्वाधिक शाळा गोंदिया तालुक्यातील
जिल्हा परिषदेच्या आमगाव तालुक्यात एकूण ११६ शाळा असून त्यापैकी ५० शाळांमध्ये सुरक्षाभिंत नाही. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात एकूण १३८ शाळा असून ७८ शाळांमध्ये तसेच देवरी तालुक्यातील एकूण १४४ शाळांपैकी ८५ शाळांमध्ये सुरक्षाभिंत नाही. गोंदिया तालुक्यात एकूण १८८ शाळा असून १०७ शाळांमध्ये, गोरेगाव तालुक्यात एकूण १०९ शाळा असून ५९ शाळांमध्ये सुरक्षाभिंत नाही. सडक-अर्जुनी तालुक्यात एकूण ११५ शाळा असून ५५ तसेच सालेकसा तालुक्यात एकूण १२० शाळा असून ६६ शाळांमध्ये सुरक्षाभिंत नाही. तिरोडा तालुक्यात एकूण १३९ शाळा असून ८१ शाळांमध्ये सुरक्षाभिंत नाही. अशाप्रकारे गोंदिया जिल्ह्यात एकूण १०६९ शाळा असून ५८१ शाळांमध्ये सुरक्षाभिंती नाहीत.
१७२ शाळांचा वीज पुरवठा खंडित
वीज बिल न भरल्यामुळे जिल्ह्यातील १७२ शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यात आमगाव तालुक्यातील २७, अर्जुनी-मोरगाव ३, देवरी ३५, गोंदिया २४, गोरेगाव १८, सडक-अर्जुनी १३, सालेकसा ५१ व तिरोडा तालुक्यातील १ शाळेचा समावेश आहे.