५८७ शाळांमध्ये ‘वाचन कुटी’
By Admin | Published: March 11, 2017 12:14 AM2017-03-11T00:14:22+5:302017-03-11T00:14:22+5:30
विद्यार्थ्यांना अवांतर वाचनात आवड निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक शाळेत ‘वाचन कुटी’ तयार करण्याची कल्पना
राज्यात गोंदिया आघाडीवर : विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाच्या गोडीसाठी यशस्वी प्रयोग
नरोश रहिले गोंदिया
विद्यार्थ्यांना अवांतर वाचनात आवड निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक शाळेत ‘वाचन कुटी’ तयार करण्याची कल्पना करून ती प्रत्यक्षात साकार करण्यात गोंदिया जिल्ह्याने पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १०४८ पैकी ५८७ शाळांमध्ये वाचन कुटी तयार करण्यात आल्या आहेत. यामुळे वाचन कुटी तयार करण्यात गोंदिया जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली असल्याची माहिती प्राथमिकचे शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी दिली.
विशेष म्हणजे लोकसहभागातून ठिकठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये या वाचन कुटी तयार करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी शासनातर्फे विकसित शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा देण्यासाठी वाचन कुटी तयार केली जात आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबर इतर पुस्तकांचे वाचन करण्यासाठी या कुटीमध्ये खास पुस्तके ठेवली जात आहेत. विद्यार्थ्यानी मोकळ्या वातावरणात ज्ञानार्जन करावे, भयमुक्त वातावरणात वाचन करून अभ्याक्रमाच्या ज्ञानाबरोबर सामान्य ज्ञानाची माहिती व्हावी यासाठी शिक्षण विभागाने ही संकल्पना पुढे आणली. या ‘वाचन कुटी’ ला लोकसहभाग मिळत आहे. गवतापासून तयार केलेल्या झोपडीला वाचन कुटी नाव देण्यात आले. ‘वाचन कुटी’त विद्यार्थ्यांना वर्तमानपत्र, विविध मासिक, पाक्षिक, साप्ताहिक, जिल्ह्यातील भौगोलिक माहितीव्यतिरिक्त विविध पुस्तके ठेवल्या जात आहेत.
झळकते अभिव्यक्ती स्वातंत्र्य
शासनाच्या आदेशावर ३१ डिसेंबर २०१५ ला प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील १०४८ शाळांत दप्तरविहीत शाळा (वाचन आनंद) कार्यक्रम पहिल्यांदा घेण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद मिळाला होता. शिक्षण विभागाला ‘वाचन कुटी’ची संकल्पना मिळाली. यातून अभिव्यक्ती स्वातंत्र्य झळकत आहे. या वाचन कुटीचा सकारात्मक परिणाम समोर येत असल्याचे शिक्षणाधिकारी नरड यांनी सांगितले.