६० लाख क्विंटल धानाची भरडाई थांबली; रब्बीतील धान खरेदी येणार अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2022 12:00 PM2022-04-14T12:00:05+5:302022-04-14T12:02:11+5:30

मागील तीन महिन्यांपासून राईस मिलर्सकडून भरडाईसाठी धानाची उचल केली जात नसल्याने गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात जवळपास ६० लाख क्विंटल धान गोदामामध्ये तसाच पडून आहे.

6 million quintals of paddy polish process stopped due to rice millers negligence | ६० लाख क्विंटल धानाची भरडाई थांबली; रब्बीतील धान खरेदी येणार अडचणीत

६० लाख क्विंटल धानाची भरडाई थांबली; रब्बीतील धान खरेदी येणार अडचणीत

googlenewsNext
ठळक मुद्देराईस मिलर्सकडून केली जातेय कुचराई

गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत खरेदी करण्यात आलेल्या गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील ६० लाख क्विंटल धानाची भरडाई अद्यापही न झाल्याने हा धान गोदामात पडला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील धान खरेदी संकटात आली असून खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळामार्फत गोंदिया जिल्ह्यात ४४ लाख १० हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली. यापैकी १३.३५ लाख क्विंटल भरडाई झाली आहे. यापेक्षा अधिक धान खरेदी भंडारा जिल्ह्यात झाली आहे. खरीप पणन हंगाम २०२१-२२ अंतर्गत पणन विभाग व आदिवासी विभागाच्या १५१ धान खरेदी केंद्रांवर ४४ लाख १० हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आला. या धानाच्या भरडाईसाठी पणन विभागाने ३२३ व आदिवासी विभागाने २८६ मिलर्ससह करारनामे केले आहेत.

राईस मिलर्सने आतापर्यंत ९.४८ लाख क्विंटल व आदिवासी विकास महामंडळाने ३.८८ लाख क्विंटल भरडाई केली. मात्र मागील तीन महिन्यांपासून राईस मिलर्सकडून भरडाईसाठी धानाची उचल केली जात नसल्याने गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात जवळपास ६० लाख क्विंटल धान गोदामामध्ये तसाच पडून आहे. या धानाची त्वरित उचल न झाल्यास रब्बी हंगामातील धान खरेदी संकटात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गोदामांची समस्या

धान साठविण्यासाठी जिल्ह्यात गोदामांची कमतरता असल्याने आवश्यकतेप्रमाणे खासगी गोदामे भाड्याने घेतली जातात. सद्यस्थितीत ९१ हजार ७५६ मेट्रिक टन गोदाम क्षमता आहे. धानाची खरेदी झाल्यावर वेळेत भरडाई न झाल्यास पुढील हंगामात साठवणुकीसाठी गोदामे उपलब्ध होत नसल्याने भरडाई वेगाने करण्याची गरज आहे.

एकाच प्रकारच्या धानाचे उत्पादन

शेतकरी एकाच प्रकारच्या धानाचे उत्पादन घेत असल्याने जमिनीचा कस व तांदळाच्या वाणांची संख्या कमी होत आहे. हे टाळण्यासाठी आधारभूत धान खरेदी केंद्रावर एफएक्यू दराचे धान येईल अशा धानांच्या जाती कृषी विभागाने शेतकऱ्यांना महाबीज किंवा इतर खाजगी कृषी केंद्राकडून उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

धानाची भरडाई प्रक्रिया अधिक गतिमान करून उर्वरित धानाची भरडाई तातडीने करावी. भरडाई करण्यास कुचराई करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.

- प्राजक्त तनपुरे, पालकमंत्री, गोंदिया

Web Title: 6 million quintals of paddy polish process stopped due to rice millers negligence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.