Corona Virus in Gondia; गोंदिया जिल्ह्यात नवीन ६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले; संख्या पोहचली ५६ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 08:24 PM2020-05-28T20:24:05+5:302020-05-28T20:25:56+5:30
गोंदिया जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे.परराज्यात आणि बाहेर जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे अडकलेले जिल्ह्यातील नागरिक,कामगार जिल्ह्यात दाखल होत आहे.त्यामुळे बधितांच्या संख्येत वाढ होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे.परराज्यात आणि बाहेर जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे अडकलेले जिल्ह्यातील नागरिक,कामगार जिल्ह्यात दाखल होत आहे.त्यामुळे बधितांच्या संख्येत वाढ होत आहे. नागपूरच्या विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून आज २८ मे रोजी प्राप्त अहवालापैकी ६ रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या ५६ इतकी झाली आहे.यामध्ये क्रियाशील रुग्ण ५३ इतके असून ३ रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे.
जिल्ह्यात पहिला कोरोना बाधित रुग्ण १० एप्रिलला बरा होऊन घरी गेला तर उर्वरित दोन रुग्ण बरे झाल्याने त्यांना आज २८ मे रोजी सुट्टी देण्यात आली असून त्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे.त्यांना ७ दिवसाच्या गृह अलगीकरणात राहावे लागणार आहे.
कोरोना विषाणूने जिल्हयात जे बाधित रुग्ण आढळले आहे त्यामध्ये १९ मे रोजी २ रुग्ण , २१ मे रोजी २७ रुग्ण,२२ मे रोजी १० रुग्ण, २४ मे रोजी ४ रुग्ण, २५ मे ४ रुग्ण , २६ मे रोजी १ रुग्ण, २७ मे रोजी १ रुग्ण आणि आज २८ मे रोजी ६ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे विषाणू चाचणी अहवालावरून आढळून आले आहे.
ज्या रुग्णांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग असल्याची सौम्य किंवा तीव्र लक्षणे दिसून येत आहे अशांना जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथील विलगीकरण कक्षात उपचारासाठी भर्ती करण्यात येते. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेत पाठविले जातात.
आतापर्यंत ९३४ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.त्यापैकी ५६ नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह तर ८०० नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.६३ नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.१५नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे.
गोंदिया येथील कोविड केअर सेंटर येथे २०८, आमगाव येथे १७,अजुर्नी /मोरगाव येथे ६०,सडक/अजुर्नी येथे ६८ ,नवेगावबांध येथे ३३,गोरेगाव येथे ३०, देवरी येथे ६ सरंडी/तिरोडा येथे १९,सालेकसा येथे १४ आणि डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ४ असे एकूण ४५९ रुग्ण आज २८ मे रोजी सायंकाळी ६ वाजतापर्यंत भरती आहे.
जिल्ह्यातील शासकीय संस्थात्मक अलगीकरण केंद्र असलेल्या चांदोरी येथे १३ ,तिरोडा येथे १२, उपकेंद्र बिरसी येथे २ ,समाज कल्याण निवासी शाळा डव्वा येथे ११, जलाराम लॉन गोंदिया येथे विदेशातून आलेले ४,आदिवासी मुलांचे वसतिगृह, देवरी येथे ८,उपकेंद्र घटेगाव येथे ६,आदिवासी मुलांची आश्रमशाळा ईळदा येथे ३३ आणि येगाव येथे ५ असे एकूण ९४ व्यक्ती शासकीय संस्थात्मक अलगीकरण केंद्रात उपचार घेत आहे.