‘स्वीमिंग पूल’ मध्ये पोहले ६ हजार लोक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 09:34 PM2019-03-13T21:34:45+5:302019-03-13T21:35:02+5:30
पोहताना अनेक व्यायाम होतात. परंतु शहरात राहणाऱ्या लोकांना पोहण्यासाठी नदी, नाले नाहीत. ज्या नदी आहेत ते कोरडे पडले आहेत. गोंदियावासीयांना पोहण्याचा आनंद घेता यावा यातूनही उत्तम खेळाडू घडावेत यासाठी जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरण तलाव दीड वर्षापासून उभारण्यात आले. लोकांसाठी खुले असलेल्या या जलतरण तलावावर गोंदिया शहर व जिल्ह्यातील ६ हजार लोकांनी याचा लाभ घेतला आहे.
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पोहताना अनेक व्यायाम होतात. परंतु शहरात राहणाऱ्या लोकांना पोहण्यासाठी नदी, नाले नाहीत. ज्या नदी आहेत ते कोरडे पडले आहेत. गोंदियावासीयांना पोहण्याचा आनंद घेता यावा यातूनही उत्तम खेळाडू घडावेत यासाठी जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरण तलाव दीड वर्षापासून उभारण्यात आले. लोकांसाठी खुले असलेल्या या जलतरण तलावावर गोंदिया शहर व जिल्ह्यातील ६ हजार लोकांनी याचा लाभ घेतला आहे.
जिल्हा क्रीडा संकुल समिती गोंदियातर्फे जिल्हा क्रीडा संकुलात उभारण्यात आलेल्या जलतरण तलाव मोठ्या प्रमाणात आकर्षकरित्या तयार करण्यात आले. या जलतरण तलावावर येणाऱ्या खेळाडूंना व नागरिकांना सर्वच प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी तेथे बाथरूम, शौचालय, चेंजींग रूम तयार करण्यात आले आहेत. महिलांसाठी वेगळ्या रूम तर पुरूषांसाठी वेगळी सोय करण्यात आली आहे. जलतरण तलावात उतरण्यापूर्वी शॉवरवर जाण्यासाठी वेगळी खोली आहे. नागरिकांना पोहण्याचा आनंद लुटता यावा, यासाठी २५ मीटर रूंद व ५० मीटर लांब टँक तयार करण्यात आले आहे. ८ फूटापासून १२ फूटापर्यंत पाणी खोल आहे. ८ फूटापासून पोहण्याची सुरूवात करणारा व्यक्ती पोहण्यात तरबेज झाल्यास १२ फुटापर्यंत जात असतो. ६ मे २०१७ रोजी लोकार्पण करून जनतेसाठी खुले करण्यात आले. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या जलतरण तलावावर पाय ठेवायला जागा नसतो. मागील दीड वर्षापासून ६ हजार लोकांनी जलतरण तलावावर हजेरी लावून पोहण्याचा आनंद लुटला. तलावाच्या चारही बाजूला पाच-पाच मीटर जागा इतर लोकांना बसण्यासाठी उपलब्ध आहे. तलावावर गर्दी वाढल्यास प्रत्येक फेरीतील लोकांना १ तासाचा वेळ दिला जातो. त्यातील ४५ मिनिटे पोहण्यासाठी व १५ मिनिटे पोहायला जाण्यापूर्वीची तयारी व पोहून आल्यानंतर तयारी करण्यासाठी दिली जाते.
पाण्यातील घाण दूरण्यासाठी बसविल्या मशीन
२५ मीटर रूंद व ५० मीटर लांब असा तयार करण्यात आलेल्या जलतरण तलावात आंघोळीसाठी लोक उतरल्यास घाण होणे साहजीक आहे. ती पाण्यातील घाण वेगळी करण्यासाठी मोठ्या मशीन त्या जलतरण तलावाच्या बाजूला उभारण्यात आलेल्या खोलीत ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे पाणी शुध्द केले जाते.
गोंदियातील लोकांना या जलतरण तलावाचा लाभ घेता यावे,यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरण तलाव उभारण्यात आले आहे. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. आता उन्हाचे दिवस सुरू होत असताना गर्दी वाढू लागली आहे.
-राजेंद्र शिंदे, तालुका क्रीडा अधिकारी गोंदिया.