वैनगंगेच्या पात्रातून ६० लाखांची रेती चोरली
By admin | Published: November 27, 2015 02:02 AM2015-11-27T02:02:56+5:302015-11-27T02:02:56+5:30
राज्यात रेतीघाटाचे लिलाव झाले नसतानाही महालगाव, मुर्दाळा येथील वैनगंगा नदीच्या पात्रातून ३००० घनमीटर रेतीचा उपसा करण्यात आला....
महसूल विभागाचे सोटेलोटे : वन विभागाने पकडले तीन ट्रॅक्टर
गोंदिया : राज्यात रेतीघाटाचे लिलाव झाले नसतानाही महालगाव, मुर्दाळा येथील वैनगंगा नदीच्या पात्रातून ३००० घनमीटर रेतीचा उपसा करण्यात आला. ९००० ब्रास रेती चोरी करून नेण्यात आली. या प्रकाराला तालुक्याच्या महसूल विभागाची मूक संमती असल्याने एवढी रेती चोरी गेल्यानंतरही कोणावरही कारवाई झाली नाही.
महालगाव, मुर्दाळा परिसरातील ३० ते ४५ ट्रॅक्टरच्या माध्यमातून मागील महिनाभरापासून वैनगंगा नदीच्या पात्रातून रात्रंदिवस जेसीबीच्या माध्यमातून रेतीचा उपसा करून ३००० घनमीटरमधील रेती काढण्यात आली. या रेती चोरीमुळे शासनाचा ६० लाखांचा महसूल बुडाला आहे. मागील महिनाभरापासून या ठिकाणातून अवैध रेती चोरी होत असताना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी एकाही वाहनावर कारवाई केली नाही.
या घाटावरून रेती चोरणाऱ्यांनी महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आर्थिक देवाणघेवाणीत बांधून ठेवल्यामुळे ते कारवाईसाठी धजावत नसल्याचे बोलले जाते. सर्व नियम धाब्यावर ठेवून रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक केली जात होती.
या घाटाचा लिलाव करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रक्रिया करण्यात आली. मात्र या घाटावरून मोफत रेती वाहतूक केली जात असल्याने कुण्याही व्यक्तीने सदर घटा घेण्यासाठी पुढाकार दर्शविला नाही. दरवर्षी या घाटावरून मोठ्या प्रमाणात रेती चोरीला जात आहे. इतरही काही घाटांवरून अशाच प्रकारे रेतीची चोरी होत आहे. पण खनिकर्म विभाग त्याकडे मुद्दाम डोळेझाकपणा करीत आहे. रेती माफियांशी असलेले अधिकाऱ्यांचे साटेलोटे आणि त्यातून होणार मिळकत पाहता कारवाई करणार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
वन विभागाची कारवाई
या घाटातील रेती काढण्यासाठी ट्रॅक्टर चालकांनी वनविभागाची जमीन जेसीबीने खोदून लांब रस्ता तयार केला आहे. वनविभागाचीही याकडे दुर्लक्ष होते. मागील महिनाभरापासून त्यांच्या जागेतून अवैध रेतीची वाहतूक होतानाही महसूल विभाग किंवा वनविभागाने करवाई केली नव्हती. यासंदर्भात नागरिकांनी एक तक्रार उपवनसंरक्षक यांच्याकडे केली. त्यानंतर सहाय्यक उपवनसंरक्षक योगेश वाघाये व त्यांच्या चमूने शनिवारी कारवाई करून तीन ट्रॅक्टर पकडले. ते तीन ट्रॅक्टर वनविभाग गोंदियाच्या कार्यालयात जमा करण्यात आले आहे.
५०० ब्रास रेतीचा साठा जप्त
या घाटावरून मोठ्या प्रमाणात रेती चोरी केली जात असल्याने मागील महिनाभरापूर्वी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी महालगाव मुर्दाळा येथील रेती चोरट्यांकडून ५०० ब्रास रेतीचा साठा जप्त करून त्या साठ्याचा पाच लाख रुपयात लिलावही केल्याचे तहसीलदार संजय पवार यांनी सांगितले. मागच्यावर्षी कारवाई झाली नाही.