देशात ६० टक्के मृत्यू असंसर्गजन्य आजाराने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 09:52 PM2019-07-07T21:52:15+5:302019-07-07T21:53:04+5:30
असंसर्गजन्य आजारांत मुख्यत्वे मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयाचे आजार, लखवा, कर्करोग सारख्या आजारांचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, या आजारांत कोणत्याही प्रकारचे तीव्र लक्षण दिसत नाही व त्यामुळे आजार जास्त बाळावल्यावर लोकांच्या लक्षात येतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : असंसर्गजन्य आजारांत मुख्यत्वे मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयाचे आजार, लखवा, कर्करोग सारख्या आजारांचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, या आजारांत कोणत्याही प्रकारचे तीव्र लक्षण दिसत नाही व त्यामुळे आजार जास्त बाळावल्यावर लोकांच्या लक्षात येतो. त्यामुळे कित्येक रु ग्णांना मृत्यू किंवा शारीरिक अपंगत्वाला सामोरे जावे लागते. यासाठी सर्व जनतेने सहा महिन्यांतून एकदा रक्तदाब व रक्तशर्करेची तपासणी करावी. कारण, देशात ६० टक्के मृत्यू असंसर्गजन्य आजाराने होत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. हिम्मत मेश्राम यांनी सांगीतले.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्र म व असंसर्गरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बुधवारी (दि.३) केटीएस रुग्णालयात जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी आयोजीत असंसर्गरोग तपासणी, निदान, उपचार व मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रोहन घुगे होते. याप्रसंगी डॉ. रवी लावनकर, डॉ. दीपक बाहेकर, डॉ. मोहबे, डॉ. शैलेश कुकडे प्रामुख्याने उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याचे कोणतेही पूर्वलक्षण नसताना हृदयाच्या झटक्याने (असंसर्गजन्य रोगाने ) अचानक दु:खद निधन झाले. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या आदेशाने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. लावनकर यांनी, अचानक एखाद्या व्यक्तीस हृदयाचा झटका आल्यास किंवा हाताची नाडी व हृदयाचे ठोके न लागल्यास दोन्ही हाताने हृदयावर मिनिटाला कमीत कमी १०० वेळा दाब देऊन व तोंडाने प्राणवायू देऊन वैद्यकीय सेवा मिळेपर्यंत रु ग्णास जिवंत ठेऊ शकतो असे सांगीतले. तसेच प्रात्यक्षिक करून दाखविले. डॉ. बाहेकर यांनी, उच्चरक्तदाब किंवा मधुमेह कुणालाही आणि कोणत्याही वयात होऊ शकतो. यापासून बचाव करायचा असल्यास दररोज किमान ४५ मिनिटे व्यायाम, फळांचे जास्त सेवन, तेलकट-तळलेले पदार्थ, मीठ, मांस कमी खाणे, व्यसन व मानसिक तणावापासून दूर राहिल्यास असंसर्गजन्य रोगापासून दूर राहू शकतो असे सांगीतले. डॉ. मोहबे यांनी, असंसर्गजन्य आजारापासून बचाव करण्यासाठी व ते होऊ नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. डॉ. कुकडे यांनी, तंबाखूचे सेवन केल्याने हृदयाची वारंवार गत वाढून पुढे हृदयाचे आजार व कर्करोग सुद्धा होतो असे सांगीतले. शिबिरासाठी डॉ. मनोज राऊत, डॉ. अनिल आटे, डॉ. शुक्ला, संजय बिसेन, आर. बी. एस. के. चे डॉक्टर , नर्स, फार्मासिस्ट, एन. यु. एच. एम. चे डॉक्टर आणि नर्स, मेंटल हेल्थ टीम, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण टीम. एस. डी. एच. तिरोडा येथील टीम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील टीमने सहकार्य केले.
९१ कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी
सदर तपासणी शिबिरात एकूण ९१ कर्मचाºयांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात ७० पुरु ष व २१ स्त्री कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यापैकी १० कर्मचाऱ्यांची रक्तशर्करा व २० कर्मचाऱ्यांचा रक्तदाब वाढलेला आढळला. तसेच ५९ ईसीजी तपासणी पैकी तीन कर्मचाऱ्यांच्या ईसीजी मध्ये बदल आढळून आला.