ठाणेदार असल्याचे सांगून हॉटेल मालकाला ब्लॅकमेल करीत उकळले ६० हजार; अश्लील व्हिडीओ केला तयार
By नरेश रहिले | Published: November 6, 2023 08:14 PM2023-11-06T20:14:12+5:302023-11-06T20:14:26+5:30
यासंदर्भात गोंदिया शहर पोलिसात अज्ञात आरोपीविरूध्द तक्रार केली आहे.
गोंदिया: शहरातील हॉटेल राईस सिटी लॉजींग येथे अश्लील व्हीडीओ तयार करून स्वत: ठाणेदार असल्याचे सांगून हॉटेल मालकाला तब्बल ६० हजाराने लुटल्याची घटना ४ व ५ नोव्हेंबर रोजी घडली. यासंदर्भात हॉटेल मालक गोपाल प्रल्हादराव अग्रवाल (६६) रा. अशोक कॉलनी गणेशनगर यांनी यासंदर्भात गोंदिया शहर पोलिसात अज्ञात आरोपीविरूध्द तक्रार केली आहे.
यासंदर्भात गोपाल अग्रवाल यांनी गोंदिया शहर पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार अज्ञात आरोपीने ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ७:१५ वाजता त्यांच्या मोबाईलवर फोन करून आपण हॉटेल राईस सिटीचे मालक बोलत आहात का? तुमच्या हाौटेलमध्ये मागील काही दिवसापूर्वी नागपूर येथील मुलगा-मुलगी थांबले होते. त्या मुलाने त्या मुलीचा अश्लील व्हिडीओ तयार करून व्हायरल केला. त्यानंतर त्या मुलीसोबत चार-पाच लोकांनी कुकर्म केल्याने यासंदर्भात नागपुरात चार्जशीट पाठवायचे आहे. ती व्हिडीओ तयार करण्यासाठी तुम्ही मदत केली म्हणून तुमचे नाव टाकत आहे. यात तुम्ही सहआरोपी होणार अशी धमकी दिली. त्या चार्जशीट म्हणून तुमचे नाव काढायचे असेल तर तर तुम्ही आमचे ठाणेदार शर्मा यांच्या बोला असे बोलून त्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीकडे फोन दिला.
त्याने नाव काढण्यासाठी पोलीस प्रोसेक्युटरला पैसे द्यावे लागतील यासाठी ४० हजार रूपयाची मागणी केली. अग्रवाल यांनी भितीपोटी ४० हजार रूपये फोन पे वर ट्रान्सफर केले. पुन्हा सकाळी १०:५८ वाजता फोन करून पोलीस प्रोसेक्युटर ४० हजारात मानत नाही आणखी २० हजार रूपये पाठवा असे सांगितले. भितीपोटी दुपारी १२.०७ वाजता पुन्हा २० हजार रूपये त्यांना पाठविले. २० हजार रूपये त्यांनी त्यांचा नोकर अमित हेमने याच्या फोन पे वरून पाठविले होते. ६० हजार रूपये उकळूनही त्यांना वारंवार फोन करून फोन करून त्रास देणाऱ्या अज्ञात आरोपीवर गोंदिया शहर पोलिसात भादंविच्या कलम ४१९, ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक वानखेडे करीत आहेत.
कोणताच गुन्हा दाखल नसतांना आरोपींनी केली फसवणूक
गोंदियाच्या राईस सीटी हॉटेलात अश्लील व्हिडीओ तयार झाल्याचा कसलाही गुन्हा नसतांना तोतया ठाणेदाराने बनवाबनवी करून गोपाल अग्रवाल यांना ६० हजाराने गंडविले. अग्रवाल यांच्या हॉटेलच्या नावावर चुकीचा संदेश पसरल्याची खोटी माहिती देऊन त्यांना लुबाडणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु ज्या फोन पे वर पैसे ट्रान्सफर करण्यात आले तो क्रमांक रवि मंचावर नागपूर याचा असल्याचे दाखविते.