गतवर्षीची ६० हजार रोपटी ‘खल्लास’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 09:30 PM2018-04-19T21:30:06+5:302018-04-19T21:30:06+5:30
महाराष्ट्र शासनाने मागील वर्षी ४ कोटी वृक्ष लागवड योजना राबविली. या योजनेत जिल्ह्यातील ५४५ ग्रामपंचायतींनी २ लाख २१ हजार २०० रोपटी लावली होती. त्यातील ५९ हजार ३९१ रोपटी जिवंत नसल्याची कबुली स्वत: ग्रामपंचायतींनी दिली आहे.
नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्र शासनाने मागील वर्षी ४ कोटी वृक्ष लागवड योजना राबविली. या योजनेत जिल्ह्यातील ५४५ ग्रामपंचायतींनी २ लाख २१ हजार २०० रोपटी लावली होती. त्यातील ५९ हजार ३९१ रोपटी जिवंत नसल्याची कबुली स्वत: ग्रामपंचायतींनी दिली आहे. म्हणजेच लावलेल्या रोपट्यांपैकी २७ टक्के रोपटी ‘खल्लास’ झाली आहेत.
वृक्षारोपणासह त्यांचे संगोपन करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. परंतु वृक्षारोपण करून निसर्गावर सोडून देण्यात आल्यामुळे सन २०१७ मध्ये लावलेल्या रोपट्यांपैकी ५९ हजार ३९१ रोपटी मेली आहेत.
यात, आमगाव तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतने २५ हजार ६०० रोपटी लावली होती. त्यातील १६ हजार ६४० रोपटी जिवंत असून ८ हजार ९६० रोपटी मेली असून जीवित रोपट्यांची टक्केवारी ६५ एवढी आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींनी २८ हजार रोपटी लावली होती. यातील १९ हजार १८० रोपटी जिवंत असून ८ हजार ८२० रोपटी मेली असून जिवंत रोपट्यांची टक्केवारी ६८ एवढी आहे.
देवरी तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींनी २२ हजार रोपटी लावली होती. त्यातील १८ हजार ५६९ रोपटी जिवंत असून ३ हजार ४३१ रोपटी मेली व जीवित रोपट्यांची टक्केवारी ८४ एवढी आहे.
गोंदिया तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींनी ४३ हजार ६०० रोपटी लावली होती. त्यातील ३३ हजार १०३ रोपटी जिवंत असून १० हजार ४९७ रोपटी मेली व जीवंत रोपट्यांची टक्केवारी ८९ एवढी आहे. गोरेगाव तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींनी २२ हजार रोपटी लावली होती.त्यातील १५ हजार ८८५ रोपटी जिवंत असून ६ हजार ११५ रोपटी मेली व जिवंत रोपट्यांची टक्केवारी ७२ एवढी आहे. सालेकसा तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींनी १६ हजार ८०० रोपटी लावली होती. त्यातील ११ हजार ९२८ रोपटी जिवंत असून त्याचे प्रमाण ७१ टक्के एवढे आहे. ४ हजार ८७२ रोपटी मेली. सडक-अर्जुनी तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींनी २५ हजार २०० रोपटी लावली होती. त्यातील १८ हजार १४४ रोपटी जिवंत असून ७ हजार ५६ रोपटी मेली व जीवित रोपट्यांची टक्केवारी ७२ एवढी आहे.
तिरोडा तालुक्यातील ९५ ग्रामपंचातींनी ३८ हजार रोपटी लावली होती. त्यातील २८ हजार ३६० रोपटी जिवंत असून ९ हजार ६४० रोपटी मेली व जिवंत रोपट्यांची टक्केवारी ७५ एवढी आहे.
म्हणजेच जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ५४५ ग्रामपंचातींनी २ लाख २१ हजार २०० रोपटी लावली होती. त्यातील १ लाख ६१ हजार १८० रोपटी जिवंत असून ८ हजार ८०९ रोपटी मेली असून जीवित रोपट्यांचे प्रमाण ७३ टक्के आहे.
एकीकडे वृक्षारोपणासाठी शासनाकडून जोर दिला जात असून विविध योजना राबविल्या जात आहेत. तर दुसरीकडे मात्र संवर्धनाकडे दुर्लक्ष असल्यामुळे लावलेली झाडे लोप पावत आहेत.
२७ टक्के रोपटी मेली
गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ग्रामपंचायतींनी वृक्षारोपणाच्या कामात चांगले सहकार्य केले. या कामात सर्वात जास्त हलगर्जी आमगाव तालुक्यात झाला आहे. आमगाव तालुक्यात लावलेली ३५ टक्के रोपटी मेली आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ३२ टक्के, देवरी तालुक्यातील १६ टक्के, गोंदिया तालुक्यातील ११ टक्के, गोरेगाव तालुक्यातील २८ टक्के, सालेकसा तालुक्यातील २९ टक्के, सडक-अर्जुनी तालुक्यातील २८ टक्के, तिरोडा तालुक्यातील २५ टक्के रोपटी मेली. जिल्ह्याची टक्केवारी बघितली असता २७ टक्के रोपटी जगू शकली नाहीत.
अनेक ठिकाणी एकाच खड्ड्यात वृक्षारोपण
ग्रामपंचायतच्या माध्यमातून दरवर्षी एकाच खड्ड्यात वृक्षारोपण होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. शासनाने असे घडू नये म्हणून प्रत्येक खड्ड्यावर सेटेलाईटच्या माध्यमातून नजर असेल व तसे नियंत्रण ठेवले जाईल म्हटले होते. परंतु तसे होताना दिसत नाही. वृक्षलागवड ज्या झपाट्याने होते, त्याच झपाट्याने त्या रोपट्यांच्या संवर्धनासाठी जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे.