६० टक्के युवकांना दारुची लत, तर ८० टक्के गुटख्याच्या आहारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 05:00 AM2022-01-13T05:00:00+5:302022-01-13T05:00:08+5:30
स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातला युवक म्हणजे ज्याच्या चेहऱ्यावर तेज आहे, शरीरात ताकद आहे, मनात उत्साह आहे आणि जो व्यसनापासून मुक्त आहे, तसेच ज्याच्या जीवनात अनुशासन आहे तो युवक आदर्श होण्याच्या वाटेवर असू शकतो; परंतु आज घडीला युवकांमध्ये या गोष्टी मुळीच अभावानेच पाहायला मिळतात. त्यामुळे आदर्श युवक घडविण्यासाठी त्या दिशेने युवकांना संस्कारक्षम बनवण्याची गरज आहे.
विजय मानकर
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : दरवर्षी १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरी केली जाते. या देशातील युवा स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातला आदर्श युवक झाला पाहिजे. हा कदाचित या मागील हेतू असावा; परंतु विद्यमान परिस्थितीत आदर्श युवक कोणाला म्हणावे हा प्रश्न सर्वसामान्य विचारवंत लोकांना पडत आहे. कारण आजचा युवक दिशाहीन झाला आहे. ६० टक्के युवकांना दारूची लत लागली आहे, तर ८० टक्के युवक तंबाखू आणि गुटख्याच्या आहारी गेल्याची बाब पुढे आली आहे.
स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातला युवक म्हणजे ज्याच्या चेहऱ्यावर तेज आहे, शरीरात ताकद आहे, मनात उत्साह आहे आणि जो व्यसनापासून मुक्त आहे, तसेच ज्याच्या जीवनात अनुशासन आहे तो युवक आदर्श होण्याच्या वाटेवर असू शकतो; परंतु आज घडीला युवकांमध्ये या गोष्टी मुळीच अभावानेच पाहायला मिळतात. त्यामुळे आदर्श युवक घडविण्यासाठी त्या दिशेने युवकांना संस्कारक्षम बनवण्याची गरज आहे. जीवनात नीती आणि चारित्र्यात शुद्धता असलेला युवक आदर्श युवक ठरू शकतो; परंतु या सर्व गोष्टी अलीकडच्या युवकांत अभावानेच दिसून येतात. जे युवक आदर्श पावलावर चालण्याच्या प्रयत्न करीत आहेत त्यांना आज योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. देशात ६५ टक्के लोकसंख्या ही ३५ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे.
अर्थात या देशात युवा वर्ग जगाच्या तुलनेत खूप जास्त आहे; परंतु या युवकाच्या अंगी असलेली ऊर्जा योग्य प्रकारे उपयोगात येत नाही. त्यामुळे आपला देश आजही आत्मनिर्भर होऊ शकला नाही.
युवकांवर गुटखा ठरतोय भारी
- सालेकसा तालुक्याच्या विचार केल्यास ५० ते ६० टक्के विद्यार्थीच दहाव्या वर्गाच्या पुढे शिक्षण घ्यायला जातात. इतर विद्यार्थी शिक्षण सोडून कामधंद्याला लागून व्यसनाधीन होत आहेत. कॉलेजमध्ये शिकणारे अनेक विद्यार्थीसुद्धा दारूच्या आहारी गेले आहे. माध्यमिक शिक्षणापासूनच अनेक विद्यार्थी गुटखा आणि तंबाखूच्या आहारी जात असल्याचे चित्र आहे.
अनुशासनाचा अभाव
- युवा अवस्थेत चेहऱ्यावरील तेज गायब झालेले आणि शरीराची शक्ती हीन झालेली असते. हृदयात करुणा संपलेली असून, नेहमी चिडचिडेपणा, अनुशासनचा अभाव, वरिष्ठांचा अनादर, चारित्र्यहीनता या गोष्टींचे प्रमाण दिवसेंदिवस युवकांमध्ये वाढत आहे.