लसीकरणासाठी वेळेत न पोहचल्याने ६ हजार डोस गेले वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:28 AM2021-05-14T04:28:43+5:302021-05-14T04:28:43+5:30
गोंदिया : कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. व्यापक जनजागृतीनंतर सुध्दा नागरिक लसीकरण केंद्रावर पोहचत नसल्याने मोठ्या ...
गोंदिया : कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. व्यापक जनजागृतीनंतर सुध्दा नागरिक लसीकरण केंद्रावर पोहचत नसल्याने मोठ्या प्रमाणात डोस वाया जात आहे. लसीकरणासाठी नागरिक वेळेत न पोहचल्याने आतापर्यंत तब्बल ६०५७ डोस वाया गेले आहे.
केंद्र शासनाच्या आदेशान्वये जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर आणि ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षावरील सर्वांना लसीकरणास सुरुवात करण्यात आली. तर १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ८३ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. मात्र ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये अद्यापही लसीकरणाबाबत गैरसमज असल्याने ते लसीकरणासाठी केंद्रावर पोहचत नसल्याचे चित्र आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात लसींचे डोस वाया जात आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ६०५७ डोस वाया गेले असून यात ३.१८ टक्के आहे. यात काेविशिल्डचे २७४१ (४.३२) टक्के व कोव्हॅक्सिनचे ३३०० डोस वाया गेले. हे डोस वाया गेले नसते तर एका गावातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असते. सध्या सर्व लसींचा तुटवडा आहे. अशात मोठ्या प्रमाणात डोस वाया जात असल्याचे बिकट चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनी नोंदणी केल्यानंतर लसीकरण केंद्रावर पोहचत लसीकरण करुन घ्यावे, त्यामुळे डोस वाया जाणे टाळण्यास मदत होईल आणि अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करणे शक्य होईल.
............
ग्रामीण भागात अफवांचा बाजार
जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोविड लसीकरणाला घेऊन बऱ्याच अफवा आहेत. त्यामुळे भीतीमुळे नागरिक लसीकरणासाठी केंद्रावर पोहचत नसल्याचे चित्र आहे. कोरोना विरुध्द लढ्यात लसीकरण हे महत्वपूर्ण शस्त्र असून नागरिकांनी बिनधास्तपणे लसीकरणासाठी पुढे येऊन लस घ्यावी, अफवांवर विश्वास ठेवू नये असे आरोग्य विभागाने कळविले आहे.
..............
लसीकरणाला येणार गती
बुधवारी जिल्ह्याला १९ हजार २०० लसींचे डोस प्राप्त झाले. गुरुवारी या लसींचे सर्व केंद्राना वितरण करण्यात आले. शनिवारपासून जिल्ह्यातील १४० केंद्रावरुन लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. या सर्व केंद्रावर नागरिकांना लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे.
..................
आतापर्यंत झालेलेे एकूण लसीकरण : १ लाख ८३ हजार २४३
आरोग्य कर्मचारी : १५३१७
फ्रंटलाईन वर्कर : २९५३७
१८ ते ४४ वयोगट : ४४१६
४५ ते ६० वयोगट : ६७४९८
६० वर्षावरील : ६५९८१