६०२ शाळांत मिळणार दूध व अंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 09:42 PM2018-05-09T21:42:56+5:302018-05-09T21:42:56+5:30
गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा व गोरेगाव या तीन तालुक्यांना दुष्काळग्रस्त समजून शासनाने या तीन तालुक्यातील वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून तीन दिवस दूध व अंडी मध्यान्ह भोजनात दिली जाणार आहे.
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा व गोरेगाव या तीन तालुक्यांना दुष्काळग्रस्त समजून शासनाने या तीन तालुक्यातील वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून तीन दिवस दूध व अंडी मध्यान्ह भोजनात दिली जाणार आहे. गोंदिया जिल्ह्याच्या तीन तालुक्यातील ६०२ शाळांतील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा व गोरेगाव या तीन तालुक्यात महाराष्ट्र शासनाने मध्यम दुष्काळ जाहीर केला होता. या दुष्काळग्रस्त भागातील वर्ग १ ते ८ च्या ६२ हजार ६९६ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ सत्र २०१८-१९ पासून मिळणार आहे. आठवड्यातून ३ दिवस दूध व अंडी देण्यासाठी दररोज ५ याप्रमाणे प्रति विद्यार्थी १५ प्रमाणे पैसे देण्यात आले. या विद्यार्थ्यांना ५२ आठवडे लाभ देण्यात येणार आहे. यासाठी ४ कोटी ८९ लाख २ हजार रूपये शासनाने दिले आहे. गोंदिया तालुक्यातील २९३ शाळांमधील ३४ हजार ६११ विद्यार्थ्यांना अंडी व दूध देण्यासाठी २ कोटी ६९ लाख ९५ हजार ७०० रूपये देण्यात आले. तिरोडा तालुक्यातील १७२ शाळांमधील १६ हजार ७२१ विद्यार्थ्यांसाठी १ कोटी ३० लाख ४२ हजार ३८० रूपये, गोरेगाव तालुक्यातील १३७ शाळांतील ११ हजार ३६४ विद्यार्थ्यांसाठी ८८ लाख ६३ हजार ९२० रूपये असे एकूण ४ कोटी ८९ लाख २ हजार रूपये दिले आहेत.
आहार घेणाऱ्या विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी
या दुष्काळग्रस्त भागातील शाळांतील विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार म्हणून दूध,अंडी व इतर पौष्टिक आहार देण्यात येणार आहे. त्या शाळांमध्ये लोकसहभाग, ग्रामनिधी किंवा जिल्हा निधीतून बायोमेट्रिक मशीन खरेदी करून त्या मशीनद्वारे विद्यार्थ्यांची हजेरी घेण्यात येईल.
प्रत्येक दिवशी वेगळा आहार
आठवड्यातून तीन दिवस पौष्टिकआहार देण्याचे ठरविले. या तीन दिवसाचे ५ रूपयाप्रमाणे १५ रूपये तीन दिवसाचे एका विद्यार्थ्यासाठी मिळणार आहेत. परंतु तीन्ही दिवस वेगळा-वेगळा आहार असावा अश्या सूचना देण्यात आल्या आहेत. देण्यत आलेली ही रक्कम फक्त पौष्टिक आहारावरच खर्च करावी अश्याही सूचना देण्यात आल्या आहेत.