२९.२२ लाखांच्या तंबाखूसह ६०.२२ किमतीचा माल जप्त; एफडीएसह नवेगावबांध पोलिसांची केली संयुक्त कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 04:27 PM2024-08-05T16:27:01+5:302024-08-05T16:28:47+5:30

Gondia : नवेगावबांध पोलिसांनी अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह संयुक्त कारवाई करून तंबाखू व तंबाखूजन्य पान मसाला केला जप्त

60.22 worth of goods seized including tobacco worth 29.22 lakhs; Joint performance of Navegaonbandh Police with FDA | २९.२२ लाखांच्या तंबाखूसह ६०.२२ किमतीचा माल जप्त; एफडीएसह नवेगावबांध पोलिसांची केली संयुक्त कामगिरी

60.22 worth of goods seized including tobacco worth 29.22 lakhs; Joint performance of Navegaonbandh Police with FDA

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या व मानवी जीवितास हानिकारक असलेली तंबाखू व तंबाखूजन्य गुटखा, पानमसाला गोंदिया जिल्ह्यात येत असताना नवेगावबांध पोलिसांनी अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह संयुक्त कारवाई करून २९ लाख २२ हजार ५६० रुपयांची सुगंधी तंबाखू व तंबाखूजन्य पान मसाला जप्त केला. पहिली कारवाई शुक्रवारी (दि.२), तर दुसरी कारवाई शनिवारी (दि.३) करण्यात आली. या दोन कारवायांत ६० लाख २२ हजार ५६० रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून, दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पहिल्या कारवाईत, छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव जिल्ह्यातील सालिक झिटिया (डोंगरगड) येथील आरोपी भूपेंद्र मोतीराम शाहू (४३) हा शुक्रवारी (दि.२) रात्री ११ वाजता डोंगरगडकडून वाहन क्रमांक एमएच ४०-सीटी ०७२५ या वाहनात तंबाखू व तंबाखूजन्य पान मसाला टाकून नवेगावबांध येथील माहेश्वरी राइस मीलसमोर येताच त्याला पोलिस व एफडीएच्या पथकाने पकडले, तर दुसऱ्या कारवाईत ट्रक क्रमांक सीजी ०७-सीक्यू ४६०२ या वाहनात तंबाखू व तंबाखूजन्य पानमसाला टाकून वाहतूक करीत असताना आरोपी मोहम्मद असमोहम्मद मुख्तार (४८), रा. इस्लामनगर सुपेला भिलाई, ता. जि. दुर्ग (छत्तीसगड) याला नवेगाव ते देवलगाव रोड नवेगावबांध ते अर्जुनी मोरगाव मार्गावर शनिवारी (दि.३) दुपारी २ वाजता पकडण्यात आले. या दोन्ही प्रकरणातील आरोपींवर अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ चे कलम २६ (२) (आय), २६ (२) (आयव्ही), २७ (३) (ई), ३ (१) (झेड झेड) (व्ही), ५९ सहकलम २२३, २७४, २७५, १२३ भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नागपूरचे सहआयुक्त (अन्न) के. आर. जयपूरकर, सहायक आयुक्त एस.पी. शिंदे यांच्या मार्गदर्शनात अन्न सुरक्षा अधिकारी एम.पी. चहांदे, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनात महिला पोलिस निरीक्षक योगीता चाफले, सहायक फौजदार अनंत तुलावी, पोलिस हवालदार उदयभान इंदूरकर, विलास वाघाये, राहुल पवार आदींनी केली आहे.


पहिल्या कारवाईत ५८ पोती तंबाखू जप्त
पहिल्या कारवाईत २९ पोती सुगंधी तंबाखू व २९ पोती पानमसाला असा ५८ पोती तंबाखू व तंबाखूजन्य साठा जप्त करण्यात आला. या २९ पोत्यांत सहा चुंगळ्ळ्यांमध्ये ९० ग्रॅम वजनाचे प्रत्येकी किमत १२० रुपये असलेले ९०४८ पाकीट एकूण वजन ८१४.३२ किलो ग्रॅम किंमत १० लाख ८५ हजार ७६० रुपये व सुगंधित तंबाखू (एम- ४) च्या २९ पोत्यांमध्ये प्रत्येकी सहा चुंगळ्ळ्या ९ ग्रॅम वजनाच्या प्रत्येकी किंमत ३० रुपये, असे ९०४८ पाकिटे एकूण वजन ८१. ४३२ किलो ग्रॅम, ज्याची किंमत दोन लाख ७१ हजार ४४० रुपये सांगितली जाते. अशाप्रकारे एकूण ८९५.७५२ किलोग्रॅम तंबाखूजन्य पदार्थ, त्याची किंमत १३ लाख ५७ हजार २०० रुपये व वाहन क्रमांक एमएच ४०- सीटी ०७२५ किमत १५ लाख रुपये, असा एकूण २८ लाख ७० हजार २०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.


दुसऱ्या कारवाईत १६ लाखांचा माल जप्त 
नवेगावबांध ते अर्जुनी-मोरगाव मार्गावर करण्यात आलेल्या दुसया कारवाईत सुगंधित तंबाखू पान मसाल्याचे एकूण ६४७.६ किलो ग्रॅम वजनाचे साहित्य जप्त करण्यात आले. त्यांची किमत १५ लाख ६५ हजार ३६० रुपये, तर ट्रक क्रमांक सीजी ०७-सीक्यू ४६०२ ची किंमत १६ लाख, असा एकूण ३१ लाख सहा हजार ३६० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
 

Web Title: 60.22 worth of goods seized including tobacco worth 29.22 lakhs; Joint performance of Navegaonbandh Police with FDA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.