जिल्ह्यात ६१ सौर कृषी पंपांचे काम फत्ते

By admin | Published: May 19, 2017 01:32 AM2017-05-19T01:32:53+5:302017-05-19T01:32:53+5:30

उर्जा सुरक्षेच्या दृष्टीने तसेच शेतकऱ्यांची वीज बिलापासून सुटका व्हावी या उद्देशातून केंद्र शासन शेतकऱ्यांसाठी राबवित असलेल्या

61 solar agricultural pumps work in the district | जिल्ह्यात ६१ सौर कृषी पंपांचे काम फत्ते

जिल्ह्यात ६१ सौर कृषी पंपांचे काम फत्ते

Next

१२० शेतकऱ्यांना दिली डिमांड : ६८ शेतकऱ्यांनी भरले पैसे
कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : उर्जा सुरक्षेच्या दृष्टीने तसेच शेतकऱ्यांची वीज बिलापासून सुटका व्हावी या उद्देशातून केंद्र शासन शेतकऱ्यांसाठी राबवित असलेल्या ‘सौर कृषीपंप योजने’चा जिल्ह्यात शुभारंभ झाला आहे. या योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या ६१ शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्यात आले असून त्यांचे काम पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील ६८ शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपांसाठी डिमांड भरली आहे.
महाराष्ट्र हे एक कृषीप्रधान राज्य आहे. नियमीत विद्युत पुरवठा किंवा विद्युत जोडणी नसल्यामुळे शेती उत्पन्नावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांवर, पर्यायाने राज्यावर विपरित परिणाम होत आहे. शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्यासाठी वीज वितरण कंपनीला अनुदान द्यावे लागत आहे. शिवाय औष्णिक पद्धतीच्या वीज निर्मितीमुळे पर्यावरणाचा ऱ्हासही होत आहे. राज्यात बहुतांश वीज निर्मिती औष्णिक पद्धतीने होत आहे. त्यामुळे वायू प्रदूषणात भर पडत असून हवामानावर विपरित परिणाम होत आहे. याकरिता केंद्र शासनाने शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी आता सौर उर्जेचा वापर करण्याचे ठरविले व त्यातूनच ‘सौर कृषीपंप योजना’ पुढे आली. या योजनेला २४ फेब्रुवारी २०१५ रोजी मंजुरी देण्यात आली आहे.
या योजनेतंर्गत जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून जिल्ह्यात आॅगस्टपासून ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्याला १९५ कनेक्शनचे टार्गेट देण्यात आले आहे. एकंदर कृषीपंपांना सौर उर्जेतून वीज पुरवठा झाल्यास शेतकऱ्यांना वीज जोडणीसाठी ताटकळत रहावे लागणार नाही. शिवाय वीज बिलाची थकबाकी असल्यास होणारी पंचाईत व वीज चोरीच्या प्रकारांपासून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. तसेच वेळी-अवेळी वीज पुरवठा खंडीत होण्याच्या प्रकारापासून शेतकरी मुक्त होऊन आपल्या शेतीला कधीही पाणी पुरवठा करू शकणार हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
त्यानुसार जिल्ह्यात १२० अर्ज मंजूर करण्यात आले असून त्यांना डिमांड नोट देण्यात आली आहे. यातील ६८ शेतकऱ्यांनी पैसे भरले व त्यांची यादी कंत्राटदारास देण्यात आली आहे.
यातील ६१ पंपांची कामे पूर्ण झाली असून उर्वरीतांची कामे सुरू आहे. म्हणजेच जिल्ह्यातील ६१ शेतकऱ्यांकडील पंप सध्या सौर उर्जेवर धडधडत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.
शिवाय लवकरात लवकर उर्वरित अर्जदारांना त्यांचे कनेक्शन देण्यासाठी विभागाकडून प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात आले.

देवरी विभागातील शेतकरी अग्रेसर
सौर कृषी पंपांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील देवरी विभागातील शेतकरी अग्रेसर दिसून येत आहेत. त्याचे असे की, मंजूर झालेल्या १२० अर्जांत देवरी विभागातील १०१ शेतकरी असून गोंदिया विभागातील १९ शेतकरी आहेत. तर यातील ६८ शेतकऱ्यांनी डिमांड भरली असून त्यात देवरी विभागातील ५५ तर गोंदिय विभागातील १३ शेतकरी आहेत. शिवाय ६१ कृषी पंपांचे काम फत्ते झाले असून यात ५० शेतकरी देवरी विभागातील तर ११ शेतकरी गोंदिया विभागातील आहेत. यातून देवरी विभागातील शेतकरी सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्सूक असल्याचे दिसून येते.
प्रोत्साहनासाठी प्रात्यक्षिक व कॅम्प
सौर कृषी पंप योजनेबाबत जास्तीत जास्त लोकांना माहिती व्हावी व अर्जदार वाढावे यासाठी वीज वितरण कंपनीकडून प्रात्यक्षीक व कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. यात सालेकसा, केशोरी व चिचगड या दुर्गम भागात कॅम्प लावले जात आहेत. येथील लोकांना (शेतकऱ्यांना) या योजनेबाबत माहिती दिली जात असून सोबतच ज्यांच्याकडे सौर कृषी पंप लागले आहेत त्या शेतकऱ्यांक डे नेऊन सौर कृषी पंपाचे प्रात्यक्षीक दाखविले जात आहे. जास्तीतजास्त लोकांना या योजनेत सहभागी करून घेण्यासाठी हे प्रयत्न विभागाकडून केले जात आहे.

 

Web Title: 61 solar agricultural pumps work in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.