घरकुल योजनेचा केंद्राचा ६.१८ कोटींचा निधी प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:19 AM2021-07-09T04:19:28+5:302021-07-09T04:19:28+5:30
गोंदिया : प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत थकीत असलेला केंद्र शासनाच्या अनुदानाचा ६.१८ कोटींचा निधी अखेर नगर परिषदेला मिळाला आहे. यासाठी ...
गोंदिया : प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत थकीत असलेला केंद्र शासनाच्या अनुदानाचा ६.१८ कोटींचा निधी अखेर नगर परिषदेला मिळाला आहे. यासाठी आमदार विनोद अग्रवाल यांनी मुंबई गृहनिर्माण मंत्रालयाचे सचिव मिलिंद म्हेस्कर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निधीची मागणी केली होती. आता लवकरच तो निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला आहे. यामुळे हजारो घरकुलांचे घरकुल लाभार्थ्यांना दिलासा मिळाला असून, घरकुल बांधकामाला वेग येणार आहे.
नगर परिषदेच्या डिपीआर-१ अंतर्गत ५१५, तर डिपीआर-२ अंतर्गत ५२० घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी राज्य शासनाच्या ३ किश्तसाठी असलेला निधी मिळाला आहे. मात्र केंद्र शासनाच्या ३ किश्तचा निधी उपयोगिता प्रमाणपत्रांमुळे प्रलंबित होता. परिणामी मागील ३ वर्षांपासून लाभार्थ्यांचे घरकुलांचे बांधकाम अडून पडले होते. अशात कित्येकांना भाड्याच्या घरात, तर कित्येकांना मांडव टाकून रहावे लागत आहे. ही बाब आमदार अग्रवाल यांच्या लक्षात आल्याने त्यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई गृहनिर्माण मंत्रालयाचे सचिव म्हेस्कर यांची भेट घेऊन त्यांना अडून असलेला निधी देण्याची मागणी केली होती. यावर म्हेस्कर यांनी निधी लवकरच देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार नगर परिषदेला ६.१८ कोटींचा निधी देण्यात आला असून, लवकरच तो लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. यामुळे आता लाभार्थ्यांना त्यांचा हक्काच्या घराचे काम लवकरच पूर्ण करता येणार आहे.