६.२५ लाख युवांना लसीकरणाची वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:21 AM2021-06-18T04:21:11+5:302021-06-18T04:21:11+5:30
गोंदिया : देशातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करावयाचे असल्याने शासनाने १८-४४ वयोगटाच्या लसीकरणालाही परवानगी दिली आहे. त्यानुसार, येत्या सोमवारपासून ...
गोंदिया : देशातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करावयाचे असल्याने शासनाने १८-४४ वयोगटाच्या लसीकरणालाही परवानगी दिली आहे. त्यानुसार, येत्या सोमवारपासून (दि.२१) या गटाचे लसीकरण सुरू होणार आहे. आरोग्य विभागाच्या अंदाजानुसार या गटात सुमारे ६.२५ लाख युवा असून ते लसीकरणाची वाट बघत आहे. विशेष म्हणजे, याच वयोगटातून सर्वाधिक प्रतिसाद मिळणार हे सुद्धा या गटातील आतुरता बघून अपेक्षित आहे.
१६ जानेवारीपासून देशात लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे. यामध्ये ४५ वर्षांपेक्षा पुढे वयोगटाचे लसीकरण सुरू आहे. आजघडीला जिल्ह्यात ३.२७ लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाची ही संख्या चांगली असली तरी पाहिजे त्या प्रमाणात लसीकरणासाठी नागरिक पुढे येत नसल्याचे दिसत आहे. असे असतानाच मात्र लसीकरणाला परवानगी नसल्याने १८-४४ वयोगटातील युवांकडून लसीकरणासाठी पवानगीची मागणी केली जात होती. शिवाय त्यांच्यात लसीकरण करून स्वत:ला सुरक्षित करण्याची ओढ दिसून येत आहे. त्यात कोरोनाच्या दुसऱ्या चांगलाच कहर केल्याने जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचे शास्त्रज्ञांनी सूचविले आहे. त्यानुसार, शासनाने १८-४४ वयोगटाच्या लसीकरणाला परवानगी दिली आहे. त्यासाठी २१ जूनचा मुहूर्त काढण्यात आला आहे. अशात आता १८-४४ वयोगटाच्या लसीकरणाला सुरूवात होणार असून या गटातील युवांना आता अखेर लस मिळणार आहे.
----------------------------------
पालकांचीही चिंता मिटणार
दुसऱ्या लाटेने युवा वर्गाचीच सर्वाधिक जीवीतहानी केली. त्यात १६-४४ वयोगटातील युवा सतत कामानिमित्त घराबाहेर असतात व त्यांचा वेगवेगळ्या लोकांशी संपर्क येतो. यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पालकांत चिंतेचे वातावरण होते. या गटाला लस देवून अगोदर सुरक्षित करा अशी मागणीही पालकांतून उठत होती. आता सोमवारपासून सर्वांनाच लस मिळणार असल्याने पालकांचीही चिंता सुटणार आहे.
-----------------------------