गोंदिया जिल्ह्यात ६२७ शाळांत वाचनकुटी उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 09:27 PM2018-11-19T21:27:08+5:302018-11-20T11:54:56+5:30
विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी वाचनकुटीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी वाचनकुटीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. वाचनकुटी तयार करणाऱ्या शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. गोंदिया जिल्ह्यात लोकसहभागातून या वाचनकुटी तयार करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील १०४८ पैकी ६२७ शाळांमध्ये वाचनकुटी तयार करण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनातर्फे विकसीत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत वाचनासाठी व विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी वाचनकुटी तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबर इतर पुस्तकांचे वाचन करण्यासाठी या वाचनकुटी तयार करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांनी मोकळ्या वातावरणात बसून ज्ञानार्जन करावे, भयमुक्त वातावरणात वाचन करून अभ्याक्रमाच्या ज्ञानाबरोबर सामान्यज्ञानाची माहिती व्हावी यासाठी शिक्षण विभागाने वाचनकुटीची संकल्पना पुढे आणली. या वाचन कुटी ला लोकसहभाग मिळत आहे. गवतापासून तयार केलेल्या झोपडीला वाचनकुटी नाव देण्यात आले. वाचनकुटीत विद्यार्थ्यांसाठी वर्तमानपत्र, विविध मासिक, पाक्षीक, साप्ताहिक, जिल्ह्यातील भौगोलिक माहिती व्यतिरिक्त विविध पुस्तके त्यात ठेवल्या जात आहेत.
झळकते अभिव्यक्ती स्वातंत्र्य
शासनाच्या आदेशावर ३१ डिसेंबर २०१५ ला प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील १०४८ शाळांत दप्तरविहीत शाळा (वाचन आनंद) कार्यक्रम पहिल्यांदा घेण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. शिक्षण विभागाला ‘वाचनकुटी’ ची संकल्पना सूचली. यातून अभिव्यक्ती स्वातंत्र्य झळकते.
‘‘बालकांना शाळेत वाचनालयाची सोय होते. भयमुक्त वातावरणात ज्ञानार्जन करतात. आनंददायी वातावरणात वाचन करण्याच्या उद्देशाने ‘वाचनकुटी’ तयार करण्यात आली. अवांतर वाचनाची सवय लावण्यासाठी ही संकल्पना पुढे आली आहे.
-उल्हास नरड
प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि.प.गोंदिया