आपत्ती निवारणात ६३.५३ लाखांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2016 01:30 AM2016-08-05T01:30:49+5:302016-08-05T01:30:49+5:30

नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे नुकसान झालेल्यांना मदतीचा हात म्हणून शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते.

63.53 lakhs spent in disaster relief | आपत्ती निवारणात ६३.५३ लाखांचा खर्च

आपत्ती निवारणात ६३.५३ लाखांचा खर्च

Next

८५.४५ लाखांचा निधी प्राप्त : काही लेखाशीर्षात जास्त खर्च
गोंदिया : नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे नुकसान झालेल्यांना मदतीचा हात म्हणून शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते. याअंतर्गत जिल्ह्याने अशा नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी यावर्षी ६३.५४ लाखांचा निधी खर्च केला आहे. यासाठी जिल्ह्याला ८५.४५ लाखांचा निधी मिळाला होता. त्यातील २१.९१ लाख रूपये शिल्लक आहेत. मात्र वास्तविकता अशी की, यातील काही लेखाशीर्षांत मिळालेल्या निधीपेक्षा जास्तीचा खर्च झाला आहे.
निसर्गाच्या कोपापुढे कुणाचेही चालत नाही. जिल्ह्याची भौगोलिक स्थिती बघता येथे पावसाळा सर्वाधिक धोकादायक काळ असतो. पावसाळ््याच्या चार महिन्यांत कोणापुढे कोणती आपत्ती उभी होणार, याचा नेम नसतो.
यात कित्येकांचे सर्वच काही हिरावले जाते. तर कुणाला नशिबाची साथ मिळाल्यास थोड्यावर त्याची सुटका होते. झालेल्या नुकसानीची भरपाई कुणीही करू शकत नसले तरीही नुकसानग्रस्तांना मदतीचा हात म्हणून शासनाकडून काही आर्थिक मदत केली जाते.
नैसर्गिक आपत्तीच्या या व्यवस्थापनासाठी शासनाकडून जिल्ह्यांना विशिष्ट निधी दिला जातो. त्यानुसार यंदा जिल्ह्याला ८५ लाख ४५ हजारांचा निधी मिळाला होता. मे महिन्यात मिळालेल्या या निधीतील ६३ लाख ५३ हजार ५०० रूपये जून पर्यंत खर्च झाले असून २१ लाख ९१ हजार ५०० रूपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे शिल्लक असल्याचे कळते. येथे जिल्ह्याला पाच लेखाशिर्षांतर्गत निधी दिला जात असून त्यानुसार जिल्हाप्रशासनाला त्यावर खर्च करावयाचा असतो. (शहर प्रतिनिधी)

२४४ लेखाशीर्षालाच मदतीची गरज
लेखाशिर्ष २४४ मध्ये वीज पडून एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना मदतीसाठी आर्थिक मदतीची तरतूद केली आहे. यात मृताच्या कुटुंबास चार लाखांची मदत केली जाते. जिल्ह्यात यंदा अशा दोन प्रकरणांत आठ लाखांची मदत करण्यात आली आहे. वास्तविक या लेखाशिर्षांतर्गत जिल्ह्याला फक्त ४५ हजार रूपये देण्यात आले आहेत. वीज पडून मृत्यू झाल्याच्या प्रकरणात संपूर्ण कागदपत्रे तयार करून फाईल शासनाकडे पाठवून त्यानंतर निधी प्राप्त होतो. या लेखाशिर्षातील निधी वाढविणे गरजेचे आहे.

असा झाला खर्च
घर व वीज पडून जखमींसाठी लेखाशिर्ष १५५ अंतर्गत जिल्ह्याला ३५ लाखांचा निधी मिळाला होता व त्यातील ११ लाख ४६ हजार ७०० रूपये खर्च झाले आहेत.
घरांची दुरूस्ती व पुर्नबांधणीसाठी लेखाशिर्ष २७१ अंतर्गत ४० लाखांचा निधी मिळाला होता व त्यातील ३४ लाख १७ हजार २०० रूपये खर्च झाले आहेत.
वीज, अपघात व पुरामुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास जनावरे खरेदीसाठी लेखाशिर्ष ३१५ अंतर्गत आठ लाखांचा निधी मिळाला होता. मात्र यात नऊ लाख ८९ हजार ६०० रूपयांचा खर्च झाला आहे.
वीज पडून माणसाचा मृत्यू झाल्यास मदत म्हणून २४४ लेखाशिर्षांतर्गत आठ लाखांचा खर्च झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यात फक्त ४५ हजार रूपयेच मिळाले होते.
पूर परिस्थितीत नागरिकांची राहण्याची सोय, औषधोपचार व जेवणावर खर्चासाठी २१७ लेखाशिर्षांतर्गत दोन लाख रूपये मिळाले असून सध्यातरी यावर काहीच खर्च करण्यात आले नाही.

 

Web Title: 63.53 lakhs spent in disaster relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.