63.68 टक्के पदवीधरांनी बजाविला मतदानाचा हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 05:00 AM2020-12-02T05:00:00+5:302020-12-02T05:00:11+5:30
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील एकूण १६९३४ मतदार होते. यात ११३३० पुरुष तर ५६०४ महिला मतदारांचा समावेश होता. यापैकी मंगळवारी एकूण ६३.६८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. जिल्ह्यातील सर्वच मतदार केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. विशेष म्हणजे नक्षलग्रस्त भागासाठी मतदानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत होती. देवरी तालुक्यात ७३.३१ टक्के तर अर्जुनी मोरगाव तालुक्यात ७१.४ टक्के मतदान झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.१) मतदान घेण्यात आले. यासाठी जिल्ह्यात एकूण २५ मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. जिल्ह्यातील एकूण १६९३४ मतदारांपैकी १०७८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला असून त्याची टक्केवारी ६३.६८ आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा सुरुवातीपासूनच चूरस दिसून आली. या पदवीधर मतदारसंघासाठी एकूण १९ उमेदवार रिंगणात होते. जवळपास सर्वच उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला होता. मतदारांमध्ये सुध्दा या निवडणुकीबद्दल उत्साह दिसून आला. जिल्ह्यातील २५ ही मतदान केंद्रावर मंगळवारी सकाळी ८ वाजतापासूनच मतदान करण्यासाठी गर्दी दिसून आली. तर गोंदिया येथील मतदान केंद्रावर सायंकाळी ६.३० वाजतापर्यंत मतदारांची गर्दी होती. त्यामुळे या केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरुच होती.
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील एकूण १६९३४ मतदार होते. यात ११३३० पुरुष तर ५६०४ महिला मतदारांचा समावेश होता. यापैकी मंगळवारी एकूण ६३.६८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. जिल्ह्यातील सर्वच मतदार केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. विशेष म्हणजे नक्षलग्रस्त भागासाठी मतदानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत होती. देवरी तालुक्यात ७३.३१ टक्के तर अर्जुनी मोरगाव तालुक्यात ७१.४ टक्के मतदान झाले. पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यात एकूण २५ मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. त्यात गोंदिया तालुक्यात ९, तिरोडा ४, आमगाव २, गोरेगाव २, सालेकसा १, सडक अर्जुनी २, देवरी २ आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यात २ मतदान केंद्र होते. एकंदरीत जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली.
मोबाईल नेण्यास मनाई
मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी जाणाऱ्या मतदारांना मतदान केंद्राच्या आत मोबाईल घेवून जाण्यास मनाई करण्यात आली होती. यासाठी मतदान केंद्राच्या प्रवेशव्दारावर मोबाईल जमा करण्यासाठी एक कांऊटर उघडण्यात आले होते. तिथे सर्वांचे मोबाईल जमा करुन ठेवले जात होते. मतदान करुन परत आल्यानंतर मोबाईल परत दिले जात होते.
चोख पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्हीची नजर
मतदान केंद्राच्या परिसरात कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच मतदान केंद्राच्या आत आणि बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. तर मतदान केंद्राच्या परिसरात बूथ लावण्यास किवा होर्डिंग, बॅनर लावण्यास मनाई करण्यात आली होती.
हॉयटेक निवडणूक
पदवीधर मतदारसंघाची निवडणूक यंदा प्रथमच हॉयटेक दिसून आली. मतदारांना त्यांच्या माेबाईलवर मतदार स्लीप, मतदान केंद्राचा पत्ता, मतदार यादीतील क्रमांक आदी पाठविण्यात आले होती. सर्वच प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी ही व्यवस्था केली होती. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून सुध्दा या निवडणुकीचा प्रचार केला जात होता. त्यामुळे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रथमच हॉयकेट दिसून आली.
नक्षलग्रस्त भागात मतदानाची टक्केवारी वाढली
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा प्रथमच चांगली चूरस दिसून आली. यापूर्वी झालेल्या या निवडणुकीसाठी ऐवढा उत्साह मतदारांमध्ये दिसत नव्हता. मात्र कोरोनाच्या सावटाखाली निवडणूक होवून सुध्दा मतदान करण्यासाठी पदवीधर बाहेर पडले. विशेष म्हणजे नक्षलग्रस्त देवरी तालुक्यात ७१ टक्के तर अर्जुनी मोरगाव तालुक्यात ७५ टक्के मतदान झाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता
कोरोनाच्या सावटाखाली पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडल्याने मतदान केंद्रावर संसर्ग टाळण्यासाठी पूरेपूर काळजी घेण्यात आली. मतदान केंद्राच्या प्रवेशव्दारावरच मतदारांची थर्मल स्क्रीनिंग, ऑक्सीजन लेव्हल तपासले जात होते. शिवाय मतदारांचे सॅनिटायझेशन करण्यात येत होते. तर प्रत्येक मतदाराला मतदान केंद्रावर हॅन्डग्लोज देण्यात येत होते. एकंदरीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग टाळण्यासाठी काळजी घेतली जात होती.