महिनाभरात ६५ लाखांचा तोटा
By admin | Published: January 7, 2017 02:01 AM2017-01-07T02:01:47+5:302017-01-07T02:01:47+5:30
नोटबंदीमुळे प्रत्येक व्यापारावर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम झाला. हा परिणाम व्यापारी,
नोटाबंदीचा परिणाम : ४ हजार वाहनांऐवजी धावतात २ हजार वाहने
गोंदिया : नोटबंदीमुळे प्रत्येक व्यापारावर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम झाला. हा परिणाम व्यापारी, छोटे विक्रेता किंवा नागरिकांवरच पडला नसून शासनाच्या महसूलावर देखील मोठ्या प्रमाणात पडला आहे. गोंदिया जिल्ह्याच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे महिनाभरात ६५ लाखाने उत्पन्न घटले असल्याची वास्तविकता पुढे आली आहे.
केंद्रसरकारने ८ नोव्हेंबर रोजी चलनात असलेल्या ५०० व १००० च्या नोटा बंद केल्यामुळे व्यापारावरच नव्हे तर सर्वांच्या कामावर विपरीत परिणाम पडला आहे. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या नोट बंदीचा परिणाम व्यापारावरच नाही तर शासनाच्या महसूलावरही पडला आहे. गोंदिया उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत शासनाला प्रत्येक महिन्याला ३ कोटी ५० लाखाचा महसूल मिळतो. राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या देवरी (शिरपूरबांध) येथील सिमा तपासणी नाक्यावरून दररोज ४ हजार वाहने धावत असत. परंतु नोेटबंदीमुळे या सिमा तपासणी नाक्यावरून फक्त २००० वाहने दिवसाकाठी धावत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महसूलात घट झाली आहे. सरकारने नोटबंदी केली तेव्हा आरटीओने जून्या नोटा स्वीकारण्याचे आवाहन केल्यामुळे नोव्हेंबर महिन्यात जून्या नोटांमुळे महिन्याच्या सरासरीत ४० लाखाने वाढ झाली होती. परंतु डिसेंबर महिन्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत ६५ लाखाने तोटा झाला आहे. दरवर्षी महसूलाच्या २० टक्के उत्पन्नात वाढ होणे अपेक्षित आहे. परंतु यंदा सन २०१५ च्या महसूलाच्या तुलनेत ६५ लाखाने घट झाली आहे. २० टक्के वाढ गृहीत धरली तर एका महिन्यात ७७ लाखाने या कार्यालयाचे महसूल कमी आले आहे. डिसेंबर महिन्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने २ कोटी ४५ लाख रूपयाचा महसूल दिला आहे.