६६१ जण राहणार दृष्टीरूपाने जीवंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2016 01:44 AM2016-06-10T01:44:51+5:302016-06-10T01:44:51+5:30
अंधत्व दूर करण्यासाठी राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम १९७८ पासून राबविण्यात येत आहे. यातूनच ‘दृष्टी २०२०’ हे विशेष
नेत्रदानासाठी पुढाकार : चार वर्षांत ७२ नेत्रांनी दिली प्रत्यक्षात दृष्टी
देवानंद शहारे गोंदिया
अंधत्व दूर करण्यासाठी राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम १९७८ पासून राबविण्यात येत आहे. यातूनच ‘दृष्टी २०२०’ हे विशेष अभियान राबवून अंधत्वाचे प्रमाण ०.३ टक्के कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नेत्रदानातून अंधांना दृष्टी देण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. मात्र गोंदिया जिल्ह्यात पुरेशा जनजागृतीअभावी हे प्रमाण कमी आहे. मागील साडेचार वर्षांत जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या नेत्रदान विभागात ७२ नेत्र बुबुळे जमा झालेली आहेत.
नेत्रदान करण्याचे प्रमाण कमी असले तरी सुशिक्षित, समंजस व विचारशील व्यक्ती नेत्रदानासाठी पुढे येत असल्याची माहिती आहे. नेत्रदानासाठी लोकांना जागृत व प्रवृत्त करण्यासाठी स्थानिक स्तरावर जनजागृतीचा अभाव आहे. केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या नेत्रपेढीत सन २०१२ मध्ये १० नेत्र बुबुळे, सन २०१३ मध्ये १४, सन २०१४ मध्ये ३०, सन २०१५ मध्ये १६ तर सन २०१६ च्या मे अखेरपर्यंत दोन नेत्र बुबुळे जमा झाल्याची नोंद आहे.
सन २०१२ ते सन २०१५ पर्यंत एकूण ६६१ व्यक्तींनी नेत्रदानासाठी नोंदणी केल्याची नोंद केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा अंधत्व नियंत्रण सोसायटीकडून देण्यात आली. यात अनेक महिलांचासुद्धा समावेश आहे. यात सन २०१२ मध्ये १५ व्यक्ती, सन २०१३ मध्ये ५०, सन २०१४ मध्ये ७० व सन २०१५ मध्ये ५२६ व्यक्तींनी नेत्रदानासाठी नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे मार्च २०१२ ते डिसेंबर २०१३ पर्यंत २१ महिन्यांच्या कालावधीत एकूण नऊ व्यक्तींनी प्रत्यक्षात नेत्रदान केले आहे. यात १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१३ या वर्षभराच्या कालावधीत चार महिला व एक पुरूष अशा एकूण पाच जणांचे मृत्यूनंतर नेत्रदान झाले आहे. सदर कालावधीत नेत्रदानामध्ये महिला आघाडीवर असल्याचे दिसून येते.
१ एप्रिल २०१३ ते डिसेंबरपर्यंत म्हणजे नऊ महिन्यांच्या कालावधीत चार व्यक्तींचे मरणोपरांत नेत्रदान झाले आहेत. यात मे महिन्यात दोन, सप्टेंबर महिन्यात एक व डिसेंबर महिन्यात एक अशा एकूण चार व्यक्तींचा नेत्रदात्यांमध्ये समावेश आहे. नेत्रदानाबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात प्रमोद अग्रवाल मेमोरियल बहुउद्देशिय संस्था ही एनजीओ कार्यरत आहे. हे सर्व नेत्रदान अशासकीय संस्था व केटीएस रुग्णालयातील अंधत्व नियंत्रण सोसायटी यांच्या संयुक्त सहकार्याने झाले आहे.
एकाचे नेत्रदान; दोघांना दृष्टी
डोळे हा निसर्गाने मानवाला दिलेला निसर्गदत्त अनमोल ठेवा आहे. मानवाला जन्मजात मिळालेली दुर्लभ गोष्ट म्हणजे दृष्टी. दृष्टिशिवाय जीवन जगण्याची कल्पनाच डोळस व्यक्ती करू शकत नाही. राज्यात २२५ नेत्रपेढ्या असून त्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत. अपघाती किंवा इतर कारणाने मृत्यू झाल्यास जवळच्या नेत्रपेढीस दूरध्वनीने कळविल्यास तेथील प्रतिनिधी येतात. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन व्यक्तींना दृष्टी मिळते व मृत्यूनंतरही मृत व्यक्तीकडून सत्कार्य घडते.
नेत्रदानाबाबत असलेले गैरसमज
जनतेत नेत्रदानाबाबत अनेक गैरसमज आहेत. नेत्रदानामुळे चेहऱ्यास विद्रुपता येते, हे धर्मविरोधी कृत्य आहे, अशा भ्रामक समजुती नागरिकांमध्ये पसरल्या आहेत. परंतु हे चुकीचे समज आहे. वास्तविक बुबुळाचा बापुद्रा फार काळजीपूर्वक काढला जातो. त्यानंतर पापण्या मिटविल्या जातात. त्यामुळे मृतकाचा चेहरा कुठेही विद्रुप होत नाही. शिवाय नेत्रदान धर्मविरोधी नसून नेत्रहिनाला दृष्टी देणे हे सत्कृत्य आहे. जिवंतपणी दोनपैकी एक डोळा दान करता येतो का, असा प्रश्न असतो. मात्र जिवंतपणी नेत्रदान करता येत नाही. केवळ मृत्यूनंतरच मृत्यूदान करता येते. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती नेत्रदान करू शकते हे विशेष.