६७ करधारकांची नावे हटविली
By admin | Published: June 10, 2016 01:51 AM2016-06-10T01:51:46+5:302016-06-10T01:51:46+5:30
गोरेगाव तालुक्यातील कुऱ्हाडी येथील ६७ करधारकांनी घर टॅक्स न भरल्यामुळे ग्रामपंचायतने त्यांची नावे नमूना-८ प्रमाणपत्रावरून हटविले.
कुऱ्हाडी गावाचे प्रकरण : करधारक ग्रामस्थांच्या अधिकारावर ग्रामपंचायतने आणली गदा
गोंदिया: गोरेगाव तालुक्यातील कुऱ्हाडी येथील ६७ करधारकांनी घर टॅक्स न भरल्यामुळे ग्रामपंचायतने त्यांची नावे नमूना-८ प्रमाणपत्रावरून हटविले. त्यामुळे त्यांच्या मालकीच्या अधिकारावरच प्रश्नचिन्ह लागले आहे. जिल्ह्यातील अशा पद्धतीचे हे पहिलेच प्रकरण आहे.
या प्रकरणाच्या चौकशीनंतर कुऱ्हाडी ग्रामपंचायतच्या सर्व पदाधिकाऱ्यांना अपात्र घोषित करण्याची पाळी येवू शकते. कुऱ्हाडी ग्रामपंचायत गोरेगाव तालुक्यातच नव्हे तर जिल्हाभरातून आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. या ग्रामपंचायतला आतापर्यंत फुले-शाहू-आंबेडकर दलित वस्ती सुधारणा व विकास अभियान, गौरव ग्रामसभा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम, आबासाहेब खेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रभागस्तरीय अशाप्रकारे पाच पुरस्कार आतापर्यंत मिळाले आहेत.
या पुरस्कारांतून कुऱ्हाडी ग्रामपंचायतला ९ लाख ५५ हजार रूपये पुरस्कार रक्कम मिळाली होती. यापैकी पाच लाख ७६ हजार १२४ रूपये विविध विकास कार्यांवर खर्च करण्यात आले. परंतु गावातील असे ६७ करधारक आहेत, ज्यांनी मागील तीन वर्षांपासून ग्रामपंचायतला कर दिले नाही. अशा करधारकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु ग्रामपंचायत सचिवाने या निर्णयाला पारित करण्यापूर्वी ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना कायदेशीर सल्ला दिला नाही. त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी एकत्रि निर्णय घेवून ६७ करधारकांची नावे नमूना-८ मधून हटविले. त्यामुळे सदर सर्व करधारकांच्या न्याय्य अधिकार व मालकी अधिकारांवरच गदा आली आहे. नमूना-८ मधून संबंधित कार्य ग्रामपंचायतने केले आहे. नमूना-८ मधून संबंधित करधारकांचा अधिकार काढून घेण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर ग्रामपंचायत प्रशासनाने सन २०१४-१५ व सन २०१५-१६ मध्ये त्यांना टॅक्सपासून वंचितही ठेवण्यात आले आहे. टॅक्सपासून वंचित ठेवण्यात आल्याने ग्रामपंचायत प्रशासनाला जवळपास दोन लाख ५२ हजार ३० रूपये ५० पैशांचे नुकसान सहन करावे लागले. जेव्हा गावातील काही नागरिकांनी ग्रामपंचायतकडून माहितीच्या अधिकारात विविध विषयांची माहिती मागितली तेव्हा हे प्रकरण उघड झाले. या प्रकरणात ग्रामपंचायतचे सर्व नऊ पदाधिकारी दोषी आढळले आहेत. (प्रतिनिधी)