दोनच तालुक्यात 678 रुग्ण ॲक्टिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 05:00 AM2022-01-17T05:00:00+5:302022-01-17T05:00:03+5:30
बाधित आढळणाऱ्या रुग्णांना कोराेना संसर्गाच्या अनुषंगाने सौम्य लक्षणे असल्याने ८५२ रुग्ण गृहविलगीकरणात असून केवळ ३५ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४८,६००५ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात २,५८,५१४ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २,२७,४९१ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४२,४८१ नमुने कोरोना बाधित आढळले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया आणि आमगाव तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे दोनच तालुक्यात सर्वाधिक ६७८ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहे. त्यामुळे हे दोन्ही तालुके कोरोनाचे हाटस्पॉट झाले असून नागरिकांना अधिक सजग राहत कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने रविवारी (दि. १६) ९१९ चाचण्या करण्यात आल्या. यात ७२७ आरटीपीसीआर तर १९२ रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आल्या. यात १६० नमुने कोरोना बाधित आढळले. त्याचा पॉझटिव्हिटी रेट १७.३९ टक्के आहे. बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचे पॉझिटिव्हिटी रेटसुद्धा वाढत असल्याचे चित्र आहे.
१ ते १६ जानेवारीदरम्यान जिल्ह्यात तब्बल १,२८५ बाधितांची नोंद झाली आहे तर ३०० वर बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. बाधित आढळणाऱ्या रुग्णांना कोराेना संसर्गाच्या अनुषंगाने सौम्य लक्षणे असल्याने ८५२ रुग्ण गृहविलगीकरणात असून केवळ ३५ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४८,६००५ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात २,५८,५१४ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २,२७,४९१ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४२,४८१ नमुने कोरोना बाधित आढळले. यापैकी ४०,७८७ बाधितांनी कोरोनावर मात केली असून सध्या स्थितीत ८८७ रुग्ण कोरोना ॲक्टिव्ह आहे.
नियमांचे करा पालन
- जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने पाय पसरत आहे. मात्र नागरिकांनी अद्यापही ही बाब गांर्भियाने घेतलेली नाही. त्यामुळे हा बिनधास्तपणा पुढे आपल्यालाच कडक निर्बंधाना सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्वांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे.
- कोरोना विरुध्दच्या लढ्यात मास्क, प्रतिबंधात्मक लस हेच महत्वपूर्ण शस्त्र आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्कचा नियमित वापर करावा.
- जिल्ह्यात सध्या १५ ते १७ वयाेगटातील मुलांचे लसीकरण सुरु असून सर्वांनी आपल्या पाल्यांना लसीकरणासाठी न्यावे.
- सर्वांनी स्वत:ची आणि आपल्या कुुटुंबियाची काळजी घ्यावी.
पॉझिटिव्हिटी रेट ८.८२ टक्के
- मागील १६ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत १,२८५ भर पडली आहे. यामुळे पॉझिटिव्हिटी रेट सातत्याने वाढत आहे. सुरुवातीला १ ते २ टक्के असलेला पॉझिटिव्हिटी रेट आता ८.८२ टक्क्यावर पोहोचला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांच्या चिंतेत थोडी भर पडली आहे.
ओपीडी २४ बाय ७ सुरू ठेवा
- कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. त्यामुळे चाचण्या करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र रविवारी सर्व कोरोना चाचणी केंद्राची ओपीडी बंद राहत असल्याने चाचणीसाठी येणाऱ्यांना परत जावे लागते. त्यामुळे कोराेनाचा संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोना चाचण्यांची ओपीडी २४ बाय ७ सुरू ठेवण्याची मागणी केली जात आहे.