तालुक्यातील ६८ अंगणवाड्या पाण्याविना

By Admin | Published: October 17, 2016 12:30 AM2016-10-17T00:30:19+5:302016-10-17T00:30:19+5:30

जिल्हा परिषदेच्या एकात्मीक बाल विकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत तालुक्यात एकूण २०१ अंगणवाड्या चालत आहेत.

68 anganwadias in the taluka without water | तालुक्यातील ६८ अंगणवाड्या पाण्याविना

तालुक्यातील ६८ अंगणवाड्या पाण्याविना

googlenewsNext

शौचालय व आवारभिंतीची गरज : दोन अंगणवाड्या सुरू होण्याच्या मार्गावर
विजय मानकर सालेकसा
जिल्हा परिषदेच्या एकात्मीक बाल विकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत तालुक्यात एकूण २०१ अंगणवाड्या चालत आहेत. यात १६६ मोठ्या आणि ३३ मिनी अंगणवाड्या चालत असून दोन अंगणवाड्या सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु १९९ पैकी ६८ अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था नसून या आंगणवाडीतील चिमुकले व कर्मचाऱ्यांना पाण्यासाठी इतर ठिकाणच्या व्यवस्थेवर अवलंबून राहावे लागत आहे. विशेष म्हणजे ३४ आंगणवाड्यांत शौचालयाची व्यवस्था नसून काहींचे शौचालय निकामी झाले आहेत. तर काही ठिकाणी मुद्दाम शौचालय बांधकाम झालेले नाही. त्यामुळे अंगणवाडीत पूर्व प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्यांना पाणी व शौचालयाच्या बाबतीत समस्यांना तोंड द्यावे लागत असते.
अंगणवाडीमध्ये ३ ते ५ वर्ष वयोगटातील मुले-मुली पूर्व प्राथमिक स्तराचे शिक्षण घेत असून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अंगणवाडी खूप महत्वाची जबाबदारी पार पाडणारा घटक आहे. अंगणवाडीत योग्य रित्या पूर्व प्राथमिक शिक्षण प्राप्त करणारे विद्यार्थी प्राथमिक शाळेत नवीन आवड व उत्साह घेऊन जातात. परंतु त्याआधी त्याला अंगणवाडीत पोषक वातावरण मिळणे आवश्यक असते. तसेच यासाठी त्या चिमुकल्यांना अंगणवाडीत मुलभूत सोयी मिळणे आवश्यक आहे. लहान मुलांचा विचार केला तर त्यांना मुलभूत सोयीमध्ये पूरक आहारासोबतच पिण्यासाठी शुद्ध पाणी आणि शौचालय आदी अती आवश्यक असते.
शासनस्तरावर यासाठी अनेक उपक्रम राबवून पुरेपूर प्रयत्न केला जातो. तरी सुद्धा जीरो ग्राऊंडवर अनेक समस्या कायम असतात व हे अनेक वेळा प्रत्यक्षात पाहावयास मिळत असते. मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक आंगणवाड्यांना आवारभिंत आवश्यक असून आरोग्याच्या दृ्टीने त्यांना मिळणारा पूरक आहार सुद्धा पोषक व शुद्ध असला पाहिजे. असे असतानाही तालुक्यात अजूनही ९४ अंगणवाड्यांना आभारभिंत नसून १८ अंगणवाड्यांत किचनशेडची सोय नाही. हे त्या अंगणवाड्यांसाठी दुदैव म्हणावे लागेल.
अंगणवाडीची व्यवस्था ही जिल्हा परिषदेच्या देखरेखीत असली तरी यासाठी मिळणारे अनुदान केंद्र शासनाकडून येते. केंद्र शासन नेहमी पुरेपूर अनुदान देण्याचा प्रयत्न करते. तरीसुद्धा अंगणवाडीमध्ये सोयीचा अभाव हा चिंतेचा विषय आहे. तालुक्याची एकूण लोकसंख्या ९२ हजार ४१९ असून यात ४६ हजार ६०० पुरुष तक ४५ हजार ८९१ स्त्रिया आहेत. यामध्ये शून्य ते सहा वर्ष वयोगटातील सात हजार ९७६ बालके असून शून्य ते तीन वर्ष वयोगटातील मुलांची संख्या चार हजार १०४ आणि तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालक तीन हजार ८७२ आहेत.
अंगणवाडीमध्ये शिकणारे विद्यार्थी हे तीन ते सहा वर्ष वयोगटातील असतात. त्यांना स्वत: निट ठेवणे जमत नाही. त्यामुळे त्यांना अंगणवाडीत पोषक वातावरण मिळणे आवश्यक आहे. तसेच त्यांना अंगणवाडीत मुलभूत सोयी मिळणे आवश्यक आहे.

९० आंगणवाड्यांत अमृत आहार योजना
भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत तालुक्यातील एकूण ३५ गावातील ९० अंगणवाडी केंद्राअंतर्गत गरोदर आणि स्तनदा मातांसाठी अमृत आहार योजना राबविली जात आहे. गरोदर मातांची संख्या २३२ आणि स्तनदा मातांची संख्या २९२ असून एकूण ५२४ मातांना अमृत आहार योजनेचा लाभ मिळत आहे.

Web Title: 68 anganwadias in the taluka without water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.