पावसामुळे ६८ बसफेऱ्या रद्द
By admin | Published: September 14, 2016 12:19 AM2016-09-14T00:19:03+5:302016-09-14T00:19:03+5:30
तीन आठवड्यांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्हावासियांना सलग चौथ्या दिवशी पावसाने हजेरी लावली.
पुजारीटोलाचे १० गेट उघडले : सालेकसा-देवरी तालुक्यांतील अनेक मार्ग बंद
गोंदिया : तीन आठवड्यांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्हावासियांना सलग चौथ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. यामुळे जलाशयांमधील पाणीसाठा बराच वाढून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र पावसामुळे अनेक रस्ते खराब झाले असून त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल. शिवाय काही कमी उंचीच्या पुलांवरून पावसाचे पाणी वाहत असल्याने एसटी महामंडळाला अनेक मार्गांवरील ६८ फेऱ्या बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. याशिवाय पुजारीटोला धरणाचे १० दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
प्रभारी आगार व्यवस्थापक झाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन-चार दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे ११, १२ व १३ सप्टेंबर या तीन दिवसपर्यंत सालेकसा तालुक्यातील तब्बल ६८ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे बसेसचा दोन हजार ६९० किमीचा प्रवास होवू शकला नसून जवळपास ४० हजार रूपयांचे नुकसान गोंदिया आगाराला सहन करावे लागले. सालेकसापुढील सर्वच फेऱ्या या तीन दिवसपर्यंत रद्द होत्या.
ग्रामीण भागातील काही रस्ते पूर्णत: खराब झालेले असून त्यांची सुधारणा न झाल्याने पाऊस आल्यावर त्या मार्गावरील वाहतूक गोंदिया आगाराला बंद करावी लागते. यात दवनीवाडा, बंजारी, शहारवाणी, सालुटोला-मोहगाव व डव्वा मार्गांचा समावेश आहे. पाऊस आल्यावर या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचते. आधीचेच हे मार्ग खराब असून पाऊस आल्यावर या रस्त्यांच्या दुरवस्थेत आणखीनच भर पडते. त्यामुळे गोंदिया आगाराला या मार्गांवरील बस वाहतूक बंद करावी लागते. शिवाय या मार्गावर काही कमी उंचीचे पूल असून त्यावरून पाणी वाहत असल्याने रहदारी बाधित होते.
दवनीवाडा मार्गावर बसफेरी सुरू करण्यात आली होती, मात्र आलेल्या पावसाने रस्ता अधिकच खराब झाल्याचे बसफेरी बंद करावी लागली. बंजारी मार्गावरील फेऱ्या सुरू होणार असल्याचे झाडे यांनी सांगितले.
विशेष म्हणजे राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगारात सन २०१२ पासून नियमित आगार व्यवस्थापक नाही. मागील चार वर्षापासून येथे प्रभारी आगार व्यवस्थापकच कार्यरत होते. मागील आगार व्यवस्थापक गौतम शेंडे यांचे स्थानांतरण झाल्यानंतर कार्यशाळा अधीक्षक झाडे यांच्याकडे सदर पदाचा प्रभार दिला. त्यामुळे बसफेऱ्या सुरळीत सुरू ठेवण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहीजे याबाबत महामंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय दिसून येत नाही. (प्रतिनिधी)