कवडी न देता बांधणार ६८ हजार शौचालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 09:41 PM2017-10-01T21:41:03+5:302017-10-01T21:41:13+5:30

जिल्हा निर्मल करण्याच्या नादात काही शौचालय कागदावर तर काही शौचालय निकृष्ट दर्जाचे बांधण्यात आले होते. तरीही देखील गोंदिया जिल्हा पाच-सात वर्षापूर्वीच हागणदारीमुक्त (ओडीएफ) झाला होता.

68 thousand toilets without damages | कवडी न देता बांधणार ६८ हजार शौचालय

कवडी न देता बांधणार ६८ हजार शौचालय

Next
ठळक मुद्देघडेल वर्तणुकीत बदल : सीईओ रविंद्र ठाकरे यांचा नाविण्यपूर्ण प्रयोग

नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा निर्मल करण्याच्या नादात काही शौचालय कागदावर तर काही शौचालय निकृष्ट दर्जाचे बांधण्यात आले होते. तरीही देखील गोंदिया जिल्हा पाच-सात वर्षापूर्वीच हागणदारीमुक्त (ओडीएफ) झाला होता. परंतु ६७ हजार ७८३ कुटुंबाकडे शौचालय नाहीत किंवा ज्यांच्याकडे आहेत ते वापरायोग्य नाही. त्यामुळे हागणदारीमुक्त असलेल्या जिल्ह्यात उघड्यावर शौच करण्याचा उपक्रम सुरूच होता. परंतु गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी शौचालयासंदर्भात जागृती घडवून शासकीय मदत न देता त्या कुटुंबाना शौचालय बांधण्यासाठी जागृत करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाची फलश्रृती अशी की जिल्ह्यातील उघड्यावर शौचास जाणाºया ९ हजार ९४७ कुटुंबाकडे शौचालय तयार झाले आहे.
गोंदिया जिल्हा हा महाराष्ट्राच्या उत्तर पूर्वेस मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून आहे. जिल्ह्याची लोकसंख्या पायाभूत सर्व्हेक्षणानुसार २ लाख १७ हजार १५३ कुटुंब एवढी आहे. यापैकी १ लाख २८ हजार ३६७ कुटुंबाकडे शौचालय वापरात आहेत. तर ८८ हजार ७८६ कुटुंबाकडे शौचालय नसल्याची नोंद घेण्यात आली होती. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व इतर योजनांच्या माध्यमातून आजतागायत ६६ हजार ५५४ वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम करण्यात आले. उर्वरित २२ हजार २३२ कुटुंब हे इतरांच्या शौचालयाचा (शेअरिंग) वापर करीत असल्याची नोंद घेण्यात आलीे. याशिवाय जिल्ह्यात एकूण ४५ हजार ५५१ वापरण्यायोग्य नसलेली/ नादुरुस्त शौचालयांची नोंद घेण्यात आली आहे.
नादुरुस्त व शेअरिंग असे एकूण ६७ हजार ७८३ शौचालयाचे बांधकाम व वापर करण्याचे उद्दिष्ट ३१ डिसेंबर २०१७ अखेर पर्यंत कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय पूर्ण करण्याचे नियोजन जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एच. ठाकरे, यांनी केले आहे. यासाठी त्यांना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड सहकार्य करीत आहेत. शौचालयासंदर्भात जागृती करण्यासाठी गृहभेट घेऊन आंतर वैयक्तीक संवाद साधला जात आहे.यासाठी जिल्हा व तालुका कर्मचाºयांची बैठक घेण्यात आली. नादुरुस्त शौचालय बांधकामाबाबत येणाºया अडचणींचा आढावा घेण्यात आला. त्यावर उपाययोजना व कुटुंबांतर्गत घेण्यात येणाºया गृहभेटीची माहिती देण्यात आली. या शौचालय बांधकामासाठी केंद्र शासनाच्या नेहरु युवा केंद्रातील १६ स्वयंसेवकांना सुद्धा गृहभेटीसाठी ग्रामपंचायती नेमून देण्यात आल्या. नेहरु युवा केंद्रातील स्वयंसेवकांनी तयार केलेले युवक मंडळ उमेद अभियानांतर्गत महिला बचत गटांची सुद्धा मदत घेत आहेत.
सरकारचा घुमजाव
सुरूवातीला १२०० रूपये किंवा ५०० रूपये अनुदान घेऊन तयार ककरण्यात आलेले शौचालय आजघडीला बंद अवस्थेत आहेत. त्या शौचालयामुळे गोंदिया जिल्हा कागदावर ओडीएफ वाटत होता. ६७ हजार कुटुंबे उघड्यावर शौचास जात असताना याकडे राज्यशासनाचे लक्ष वेधण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी या कुटुंबाचे शौचालय महाराष्टÑ ग्रामीण रोजगार हमी योजनेतून बांधण्याचे आदेश दिले होते. परंतु केंद्र शासनाने या प्रस्तावाला मान्यता न दिल्यामुळे पुन्हा राज्य सरकारने घुमजाव केला. परिणामी तोडगा म्हणून आता जनजागृतीतून हे शौचालय बांधले जात आहेत.
गृहभेटीची त्रिस्तरीय योजना
गृहभेट हे साध्य नाही, ते साधन आहे. म् हे साधन वारंवार वापरले गेले पाहिजे. गृहभेट हा सातत्याने करण्यात येणारा प्रयोग आहे. केवळ एक गृहभेट करुन चालत नाही तर वर्तणुकीत बदल हवा, असे वारंवार लोकांच्या मनावर बिंबविण्यासाठी गृहभेटीत सातत्य ठेवून एकाच घरी किमान तीन वेगवेगळ्या स्तरावर गृहभेट करण्याचे नियोजन केले आहे.जिल्हास्तरावरील जि.प.च्या १७ विभाग प्रमुखांना तालुकास्तरावर पालक अधिकारी नेमण्यात आले. त्या सर्वांनाच एक ग्रामपंचायत विशेष कार्यासाठी दत्तक देण्यात आली. या अधिकाºयांच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर गृहभेटी देत आहेत. तालुकास्तरावरील वर्ग १ ते ३ च्या अधिकाºयांना ग्रामपंचायतस्तरावर नोडल अधिकारी नेमण्यात आले. गावस्तरावरील नादुरुस्त शौचालयांचा वापर, शालेय व अंगणवाडी येथे शौचालयांचा वापर, गावात समग्र स्वच्छता, गुडमार्निंग पथक राबवून लोकांना शौचालयाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. जिल्ह्यात तालुकास्तरावर ४६० अधिकारी/कर्मचारी नेमले आले आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण ) अंतर्गत गटसंसाधन केंद्रातील २४ गट/समूह समन्वयक, नेहरू युवा केंद्रातील १६ स्वयंसेवकांना ग्रामपंचायतीची विभागणी करुन देण्यात आली. दररोज प्रत्येक घरी किमान अर्धातास वेळ देवून एका दिवसांत जास्तीत जास्त १७ ते २० गृहभेटीचे लक्ष्य या गटाकडे सोपविण्यात आले.
९९४७ कुटुंबांनी बांधले शौचालय
‘खुले मे शौच से आझादी’ हे ब्रिद घेऊन सुरू केलेल्या या उपक्रमातून जबरदस्त जनजागृती करण्यात आल्याने गोंदिया जिल्ह्यातील ९ हजार ९४७ लोकांनी आॅगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्याच्या काळात शौचालयाचा वापर सुरू केला. ज्यांच्याकडे शौचालय नाही किंवा ज्यांच्याकडे शौचालय आहे,परंतु ते वापरात नसल्यामुळे त्यांना दुरूस्त करून वापर सुरू केले आहे. उघड्यावर शौचास जाणार नाही असा चंग या कुटुंबानी बांधला आहे.

जिल्हा ओडीएफ असूनही अनेक कुटुंब उघड्यावर शौचास जात होते. उघड्यावर शौचास गेल्यास होणारे आजार व समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण कसा आहे हे त्या कुटुंबाना पटवून दिले जात असल्यामुळे त्या लोकांनी पुढाकार घेऊन शौचालय बांधले आहेत. ३१ डिसेंबर पर्यंत प्रत्येकाने शौचालयाचाच वापर करावा यासाठी संपूर्ण शौचालय बांधकामाचे उद्दीट्ये ठेवण्यात आले आहे.
-रविंद्र ठाकरे
मुख्य कार्यपालन अधिकारी जि.प. गोंदिया.

Web Title: 68 thousand toilets without damages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.