खासगी शाळांतील ६९७ विद्यार्थी परतले जि.प. शाळेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 10:52 PM2019-04-09T22:52:57+5:302019-04-09T22:53:54+5:30
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने गोंदिया जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक नमुना पुन्हा पुढे आला आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्टÑामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील व खासगी शाळांतील विद्यार्थी जि.प. शाळांतील शिक्षण पाहून जि.प. शाळेत परत येत आहेत.
नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने गोंदिया जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक नमुना पुन्हा पुढे आला आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील व खासगी शाळांतील विद्यार्थी जि.प. शाळांतील शिक्षण पाहून जि.प. शाळेत परत येत आहेत. गोंदिया जिल्ह्यात मागील दोन वर्षात खासगी शाळांमधील ६९७ विद्यार्थ्यांनी १०९ जि.प.शाळांत प्रवेश घेतला आहे.
जि. प. शाळांतील शिक्षण चांगले नाही म्हणून ग्रामीण भागातीलही विद्यार्थी शहरातील इंग्रजी माध्यम किंवा खासगी शाळांमध्ये प्रवेश घेत होते. परंतु महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांचा दर्जा सुधारणासाठी आणलेल्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमामुळे जि.प.शाळांतील शैक्षणिक दर्जा सुधारला आहे. भौतिक सुवधातही वाढ झाली आहे. त्यामुळे आता खासगी शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांकडे आहे.
प्रगत महाराष्ट्रातील पहिला जिल्हा म्हणून नावारूपास गोंदियाला आणण्यासाठी शर्यतीने प्रयत्न सुरू झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १०४९ शाळा ह्या ज्ञान रचनावादाचे शिक्षण देत आहेत. बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला दर्जेदार व गुणवत्तायुक्त शिक्षण देणे ही राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्था यांची जबाबदारी आहे. अध्ययन संपादणूक सर्व्हेच्या अहवालानुसार अपेक्षित अध्ययन निष्पती प्राप्त न झाल्याचे शासनाच्या लक्षात आल्याने राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २२ जून २०१५ रोजी एक शासन निर्णय काढून शिक्षण क्षेत्रात क्रांतीकारी बदल घडवून आणण्याचा माणस बांधला आहे. या उपक्रमाला कृतीत उतरवून राज्यात प्रगत शिक्षणात गोंदिया जिल्हा प्रथम असावा यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी २०० शाळा दत्तक घेऊन तसेच गटशिक्षणाधिकारी व अधिनस्त विस्तार अधिकारी, केंद्रप्रुख यांना दत्तक घेण्यास भाग पाडून त्या शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना प्रगत करण्याचा माणस बांधला आहे. ज्ञानरचनावादी पध्दतीने शिकावे, अशी अपेक्षा आहे.लेखन, वाचन व गणित क्रिया बालकांंना प्राप्त करणे आवश्यक आहे. बालकाचा बहुमुखी विकास करण्यासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये अनेकांगी बदल करण्यात आला आहे.
ज्ञानार्जनाचे सुलभ पध्दती
६ ते १४ वयातील बालकांना दर्जेदार व गुणवत्तापुर्ण शिक्षण देणे, १०० टक्के विद्यार्थी प्रगत करणे, प्रत्येक शाळेला स्वच्छ व सुंदर परिसर उपलब्ध करून देणे, शाळेत लोकसहभाग वाढविण्यावर भर, शिक्षकांची गुणवत्ता व कल्पकतेला वाव, शाळेत शैक्षणिक साहित्यावर भर, अप्रगत मुलविहीन शाळा करणे,विद्यार्थ्यांच्या स्वयंअध्यनावर भर, विद्यार्थ्यांनी स्वयंअध्ययनावर भर, विद्यार्थ्यांना कृतीद्वारा शिक्षण घेणे, विद्यार्थ्यांची कठिण विषयाविषयी आवड निर्माण करणे, शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांच्या मनातील भिती नाहीसी करणे, शाळा सुंदर, बोलक्या करणे, विद्यार्थ्यांची शाळेविषयी आवड निर्माण करणे, सोप्या व सुलभ पध्दतीने ज्ञानार्जन करून विद्यार्थ्यांच्या संपादणूक क्षमतेत वाढ करणे, सर्वांगिण विकास करणे व विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचे काम या उपक्रमातून केले जात असल्याने खासगी शाळांतील विद्यार्थ्यांचा कल जि.प. शाळांकडे वळत आहे.
खासगी शाळेतील ३९५ विद्यार्थी परतले
जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा बोलक्या करण्यावर भर देण्यात आला. खासगी शाळेतून जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३९५ झाली आहे. गोरेगाव तालुक्यात ५४, सालेकसा ४४, अर्जुनी-मोरगाव १४, सडक-अर्जुनी १५, गोंदिया १२६, तिरोडा ६२, देवरी ३३ व आमगाव ४७ विद्यार्थ्यांनी खासगी शाळेतून जिल्हा परिषद शाळेत नाव दाखल केले.